अमरावती : बाजार समितीच्या निवडणुकीत सोसायटी व ग्रामपंचायत मतदारसंघातील १५ संचालक पदांसाठी १० आर क्षेत्र धारण करणारे शेतकरी उमेदवार राहू शकतात. परंतु या उमेदवाराचे नाव मतदार यादीत नसल्याने त्याला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. उमेदवारांनाच स्वत:ला मत देण्याचा अधिकार नसल्याने यावेळची निवडणूक विशेष चर्चिली जात आहे.
बाजार समितीचे अंतरंग शेतकऱ्यांशी निगडित असताना त्यांना या निवडणुकीत उमेदवार म्हणून राहता येत नव्हते. त्यामुळे यावेळी शासनाने १० आर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना बाजार समतीच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहता येईल, असा कायदा केला. त्या अनुषंगाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियम) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा केलेली आहे व यासंबंधी १५ मार्च २०२३ रोजी राजपत्रदेखील अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे. जिल्ह्यात साधारणपणे ४.२० लाख शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना पहिल्यांदाच सहकारात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बाजार समितीत उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मात्र, या शेतकरी उमेदवाराचे नाव संबंधित बाजार समितीच्या मतदार यादीत नसल्याने त्याचा मतदानाचा हक्क हिरावला गेलेला आहे. यासाठी शेतकरी उमेदवार निवडणूक लढवीत असलेल्या ग्रामपंचायत किंवा सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातील मतदारांवर निर्भर राहावे लागणार असल्याचे वास्तव आहे.