अमरावती : जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, अंजनगाव सुर्जी, तिवसा, मोर्शी व अमरावती-भातकुली अशा पहिल्या टप्प्यात सहा बाजार समित्यांच्या निवडणुका शुक्रवार, २८ एप्रिल रोजी होत आहे. गत काही दिवसांपासून बाजार समिती निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने नेते, पदाधिकाऱ्यांची धावपळ आता थांबणार आहे. या निवडणुकीसाठी आमदार, खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
जिल्ह्यातील बारापैकी सहा बाजार समितीची निवडणूक २८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजता दरम्यान मतदान व त्यानंतर तासाभरात मतमोजणी होणार आहे. यामध्ये फक्त अमरावती-भातकुली बाजार समितीची मतमोजणी २९ तारखेला होणार आहे. १२ बाजार समितीच्या निवडणुकीत २१६ संचालक पदांसाठी ४३० उमेदवार आहेत.
येथे होणार मतदान
- अमरावती- भातकुली : जिल्हा परिषद मुलींची शाळा (गर्ल्स हायस्कूल) कॅम्प अमरावती.
- चांदूर रेल्वे : जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, मराठी शाळा, चांदूर रेल्वे
- नांदगाव खंडेश्वर, नांदगाव हायस्कूल, नांदगाव खंडेश्वर
- मोर्शी : शिवाजी उच्च माध्यमिक शाळा, मोर्शी
- तिवसा : श्री. देवराव दादा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तिवसा
- अंजनगाव सुर्जी : नगर परिषद माध्यमिक विद्यालय मराठी, अंजनगाव सुर्जी आठवडी बाजार, अंजनगाव सुर्जी
दुसऱ्या टप्प्यातील सहा बाजार समितीत निवडणूक ३० एप्रिल रोजी
दुसऱ्या टप्प्यात अचलपूर, दर्यापूर, चांदूरबाजार, धामणगाव रेल्वे, धारणी व वरुड या बाजार समित्यांसाठी ३० एप्रिलला मतदान व त्याच्या तासाभरात मतमोजणीस प्रारंभ होणार आहे.
एखाद्या मतदाराचे नाव एकाच मतदारसंघाच्या मतदार यादीत एकापेक्षा जास्त वेळा समाविष्ट असल्यास संबंधित मतदाराला त्या मतदारसंघात निवडून द्यावयाच्या सदस्य संख्येइतके मतदान करता येणार आहे. त्यामुळे संबंधित मतदाराला एकापेक्षा जास्त वेळा मतदान करता येणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने हा सुधारित आदेश काढला आहे.
मतदाराला एकापेक्षा अधिक मतदारसंघात मतदानाचा अधिकार
एकाच मतदाराचा एकापेक्षा अधिक मतदारसंघाकरिता तयार करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीत समावेश झालेला असल्यास अशा मतदाराने एकापेक्षा अधिक मतदारसंघांत मतदान करणे अपेक्षित असल्यामुळे बाजार समितीच्या प्रत्येक मतदारसंघाच्या मतदानाकरिता महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती (समितीची निवडणूक) नियम २०१७ चे नियम ४५ (३) मधील निर्देशानुसार, अनुक्रमे डाव्या हाताचा अंगठा, डाव्या हाताची तर्जनी, डाव्या हाताची मध्यमा, डाव्या हाताची अनामिका व डाव्या हाताच्या करंगळीवर पक्क्या शाईची खूण करण्यात यावी. डाव्या हाताची सर्व बोटे नसतील तर त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यास किंवा वरीलप्रमाणे अनुक्रमे इतर बोटांस आणि दोन्ही हातांची सर्व बोटे नसतील तर त्याला असलेल्या डाव्या किंवा उजव्या हाताच्या टोकास पक्क्या शाईची खूण करण्यात यावी, असे २७ एप्रिलच्या आदेशात कळविले आहे.