शासन अनुकूल : कॅबिनेटच्या बैठकीनंतर अधिसूचनेची शक्यताअमरावती : जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या नगरनगराध्यक्ष पदाची निवडणूक जून महिन्यात होत आहे; मात्र या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता असून राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत याविषयी लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चिखलदरा वगळता अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूरबाजार, चांदूररेल्ेवे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरूड व शेदुंरजना घाट येथील नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका जून महिन्यात संभावित आहे. नगराध्यक्षपदाचे रोष्टर अद्यापपर्यंत निघाले नाही. मात्र प्रशासनाने या निवडणुकीची तयारी चालविली आहे. राज्यभरातील नगरपरिषदांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुक आघाडीच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. अशातच लोकसभा निवडणुकीची आआचारसंहिता आणि शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता सुरू झाल्याने नगराध्यक्षांना कामे करणे कठीण झाले आहे. चार महिन्यांचा कालावधी आचारसंहितेमध्ये गमविला गेल्याची बाब बहुतांश नगराध्यक्षांनी शासनाकडे विशद केली आहे. आचारसंहितेच्या काळात जी काही विकास कामे करता आली नाही ती कामे पूर्ण करता यावी यासाठी जूनमध्ये होणार्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका या विधानसभेच्या निवडणुकांनंतर घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. नगराध्यक्षांच्या या मागणीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुकूल आहेत. हा विषय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केल्यानंतर यासंदर्भात अधिसूचना काढण्याची तयारीदेखील शासनाची असल्याची माहिती आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचे असेल तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका या लांबणीवर टाकण्याशिवाय गत्यंतर नाही, असा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याबाबत निर्णय होताच या विषयाची अधिसूचना त्वरेने काढली जाईल, असे संकेत आहे. हा निर्णय राज्यभरासाठी लागू होईल, वास्तव आहे. (प्रतिनिधी)
नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर?
By admin | Published: May 31, 2014 11:07 PM