सहारानगरातील घटना : तीन जण जखमी, विद्युत उपकरणे जळालीअमरावती : वादळी वार्यामुळे विद्युत तारेचा स्पर्श घराला झाल्याने तीन जण जखमी झाले. तसेच घरातील सर्व विद्युत उपकरणे जळाली. शुक्रवारी सायंकाळी नागपुरी गेट पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या सहारानगरात ही घटना घडली. फरजाना परवीन अब्दुल कदीर (५५) ,रुखसाना परवीन शेख कासम (५५) व नुरसबा अब्दुल कदीर (१५) असे जखमीचे नावे आहे. सहारानगरात युसुफ पिंजानी यांच्या घरात पाच ते सहा कुटुंबीय भाड्याने राहत आहेत. अब्दुल कदीर यांचेही कुटुंब तेथे राहत आहेत. पिंजाणी यांच्या घरावरुन विद्युत तारेची ३२ केव्हीची लाईन गेली आहे. शुक्रवारी पिंजाणी कुटुंबीय लग्न समारंभाकरिता बाहेर गेले होते. दरम्यान सायंकाळी वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे त्यांच्या घरावरील विद्युत तार तुटून लोखंडी ग्रीलमध्ये अडली. त्यामुळे घरात विद्युत प्रवाह संचारला. यावेळी घरात असलेले भाडेकरु नुरसबा अब्दुल कदीर, फरजाना परवीन अब्दुल कदीर व पाहुणे म्हणून आलेली रुखसाना यांना विद्युत प्रवाहाचा जबर धक्का बसला. यामध्ये तिघीही जखमी झाल्या. तसेच घरातील सर्व विद्युत उपकरणे जळाली. विद्युत प्रवाहाच्या झटक्याने जखमींनी आरडाओरड केला असता शेजारी धावून आले मात्र वादळी वारा सुरु असतानाच काही क्षणात त्या विद्युत तारा घराहुन पुन्हा बाजूला सरकल्यामुळे त्या बचावल्या. जखमींना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. नुरसबा हिचा उपचार अजूनही अद्याप सुरू आहे. अब्दुल कदीर यांच्या घरात पाच सदस्य आहेत. या घटनेची तक्रार नागपुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी जखमीचे बयाण नोंदविले आहे. (प्रतिनिधी)
तारेच्या स्पर्शाने घरात विद्युत प्रवाह
By admin | Published: June 07, 2014 11:42 PM