ऊर्जामंत्र्यांच्या घराला विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार घेराव, चांदूर रेल्वेवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन
चांदूर रेल्वे : विविध मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ४ जानेवारीला नागपूर येथे ‘वीज व विदर्भ मार्च’ काढून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्यात येणार आहे. सदर आंदोलनात चांदूर रेल्वे तालुकावासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन एका बैठकीतून करण्यात आले व कोरोनाकाळातील वीज बिल सरकारने भरावे, अन्यथा मंत्र्यांना विदर्भात फिरणे मुश्कील करू, असा इशाराही देण्यात आला.
विदर्भातील जनतेचे कोरोनाकाळातील वीज बिल सरकारने भरावे. २०० युनिटपर्यंत वीज मोफत द्या. ठेवीदर निम्मे करा. कृषी पंपाच्या वीज बिलातून मुक्त करा आदी मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्यात ९ हजार ९९३ कोटी पश्चिम महाराष्ट्राला दिले, तर फक्त सात कोटी विदर्भाच्या शेतकर्यांना मिळाले. विदर्भातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई तसेच स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करा, या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती येत्या ४ जानेवारीला नागपुरातील संविधान चौकातून वीज व विदर्भ मार्च काढणार आहे. हा मार्च ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या निवासस्थानाला घेराव घालेल व त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन होईल. यासंदर्भात चांदूर रेल्वे शहरात १४ डिसेंबर रोजी जाधव कॉम्प्लेक्समध्ये बैठक पार पडली.
बैठकीला मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडीच्या अध्यक्ष रंजना मामर्डे, जिल्हा समन्वयक राजेंद्र आगरकर, पांडुरंग बिजवे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तालुकाध्यक्ष अशोक हांडे, डॉ. सुरेंद्र खेरडे, बाबाराव जाधव, प्रभाकर अर्जापुरे, नंदकिशोर देशमुख, माधव कावलकर, दीपक शंभरकर, गुजर आदींची उपस्थिती होती.