अमरावती : यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेची कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम केलेली नसताना काही शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी गुगल फाॅर्मच्या माध्यमातून प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज मागवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांनी अशा प्रकाराबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे.
राज्यात दरवर्षी दहावीच्या निकालानंतर महानगरातील अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने आणि उर्वरित राज्यातील प्रवेश स्थानिक पातळीवर केले जातात. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, मूल्यमापन पद्धती अद्याप निश्?चित झालेले नाही तसेच महानगरातील अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाची आणि उर्वरित राज्यातील अकरावी प्रवेशाची कार्यपद्धती निश्?चित केलेले नाही. असे असताना काही शाळा महाविद्यालयातून प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे निदर्शनास आल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.राज्यातील अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबतची दिशा निर्देशन शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर कळवण्यात येणार आहे. यापूर्वी कोणत्याही शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया सुरू करू नये असे या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.सदरचे पत्र शिक्षण उपसंचालक कार्यालयानेही जारी केले आहे.