अमरावती - केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात गुरुवारी जिल्ह्यात हजारो मोर्चेकरी एकवटलेत. ‘हम भारत के लोग’ असे म्हणत त्यांनी नागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात जिल्हा कचेरीवर धडक दिली. अचलपूर, परतवाडा, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी येथेही तहसील व उपविभागीय कार्यालयावर मूक मोर्चा काढून विरोध करण्यात आला. या मोर्चात मुस्लिम समुदायाची उपस्थिती लक्षणीय होती. अमरावती येथे इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मूक मोर्चा निघाला. भारत मुक्ती मोर्चा, भारत मुक्ती पार्टी, जमियत उलेमा-ए-हिंद, भीम आर्मी, महामानव संघटना, बारा बलुतेदार संघटना, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, ओबीसी महासभा, आप, टिपू सुल्तान ब्रिगेड, टिपू सुल्तान सेना, एमआयएम, इंडियन युनियन मुस्लिम लिग, युथ मुस्लिम लिग, पहल फाऊंडेशन (बडनेरा), विदर्भ उर्दू साहित्य समिती आदी ३६ संघटनांचा यात सहभाग होता. मोर्चेक-यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा होता. यावेळी मोर्चेक-यांनी विविध घोषणा फलकांद्वारे आपल्या समस्येकडे लक्ष वेधले. हा मूक मोर्चा जिल्हा कचेरीवर पोलिसांनी अडविला.यानंतर मोर्चातील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना मागणीचे निवेदन सादर केले. हे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधानांकडे पाठविण्याची विनंती करण्यात आली. यावेळी मोर्चातील प्रमुख वक्त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना सदर अन्यायकारक विधेयक रद्द करण्याची मागणी केली. बडनेरा शहरातही नागरिकत्व संशोधन विधेयकाला विरोध करण्यात आला. पाण्याच्या टाकीवर चढून निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी सीएबी/सीएएस २०१९ विधेयक रद्द करण्याची मागणी केली. हातात राष्ट्रध्वज अन् फलकनागरिकत्व संशोधन विधयेकाविरोधात १९ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या मोर्चेकºयांच्या हाती राष्ट्रध्वज आणि मागणीचे फलक झळकत होते. ‘हम भारत के लोग’, ‘भारत हमारी जन्मभूमी है’ असे लक्षवेधी फलक नागरिकांचे लक्ष वेधणारे ठरले.
पोलिसांचा तगडा बंदोबस्तनागरिकत्व संशोधन विधेयकाविरोधात तीव्र विरोध दर्शविण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गुरुवारी जिल्हा कचेरीवर मूक मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता इर्र्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर हे स्वत: या मोर्चावर लक्ष ठेवून होते.