अमरावती : महाराष्ट्रातील २० पुरोगामी संघटनांनी एकजूट होऊन अमरावती येथील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा मुंबई येथील आझाद मैदानावर बुधवारी तीव्र निषेध करीत आंदोलन केले. यामध्ये अमरावतीतील १०० ते १५० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
अमरावती येथे ४ जानेवारीला श्री शिवाजी महाविद्यालयात राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे हे एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी प्रशांत राठोड याने गरिबांना उच्चशिक्षण मोफत मिळणार का, असा प्रश्न केला होता. त्यावेळी उत्तर मिळण्याऐवजी तावडे यांनी विद्यार्थ्याला दमदाटी केली व त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणा-या युवराज दाभाडे या युवकाला अटक करण्याचे आदेश दिले होते. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबई येथील आजाद मैदानावर राज्यातील २० पुरोगामी संघटनांनी मिळून इशारा आंदोलन केले. या आंदोलनमध्ये अमरावती येथील १०० ते १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी राजीनामा द्यावा तसेच राज्यातील विद्यापीठांनी सत्र परीक्षा पद्धत रद्द करावी यांसह इतर २० मागण्यांसाठी इशारा आंदोलन करण्यात आले. यामधे महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशन मुम्बई, छात्र भारती, लोकशाही युवा संघटना, प्रहार विद्यार्थी संघटनेसह २० विद्यार्थी संघटनांचा सहभाग होता. त्यासाठी मुंबई येथे विद्यार्थी हक्क संरक्षण संयुक्त समिती स्थापन करण्यात आली. यात समितीचे मुख्य समन्वयक सिद्धार्थ इंगळे, प्रशांत राठोड, युवराज दाभाडे व साबीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. अमरावती येथून साबीर शेख, प्रशांत राठोड, युवराज दाभाडे, अणुयुग घावडे, पवन इंगोले, स्वप्निल उतखेडे, संकेत सोनार, ऋषीकेश लाहोरे, निकेश जाधव, संघवीन जाधव, विकास राठोड, मंगल राठोड, घनश्याम राठोड, अनिल पवार, सुनील पवार, निरंजन पवार, विभीषण पवार, दुर्योधन राठोड, लवेश रूणवाल आदी उपस्थित होते.