- गणेश वासनिक अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या सातपैकी पाच प्रकल्पांत कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या नावे १ कोटी ९५ लाख, ८२ हजार १३३ रुपयांचा अपहार झाला असून दोन दिवसांत संबंधित संस्थेविरूद्ध तक्रार दाखल करण्यात येणार आहे.औरंगाबाद येथील श्रीमंत महाराज महादेवराव सिंधीयाजी फाऊंडेशन, जाणता राजा चॅरिटेबल ट्रस्ट आणि परभणी जिल्ह्यातील लोहारा येथील क्रांतिज्योती प्रमिलाजी चव्हाण महिला मंडळ या संस्थेने आदिवासी युवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षणात सन २०१२ ते २०१६ या कालावधीत अपहार केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.नाशिक येथील आयुक्त, तसेच अमरावतीचे अपर आयुक्त यांनी फौजदारी कारवाई करावी, अशा सूचना अगोदरच प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केल्या आहेत. मात्र, औरंगाबाद व किनवट येथील प्रकल्प अधिकाऱ्यांनी अपहाराचे प्रकरण पोलिसांत देण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे दिसून येते.धारणी येथील सहायक प्रकल्प अधिकारी किशोर पटेल, पुसद येथील आदिवासी विकास निरीक्षक ए. एस. इंगळे, तर कळमनुरी प्रकल्पातील वरिष्ठ लिपीक के. बी. भोरपे यांची नियुक्ती प्राधिकृत अधिकारी म्हणून केली असून फौजदारी दाखल करण्यासाठी यांना पुढाकार घ्यावा लागेल.कौशल्य विकास आयुक्तांचे पत्रही बनावटआदिवासी युवक, युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण ही योजना कागदोपत्री राबविली. मात्र, प्रशिक्षणाथींंना दिलेले प्रमाणपत्रही बनावट होते, हे चौकशीतून समोर आले आहे. प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि त्यावरील स्वाक्षरी बोगस असल्याचे केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आयुक्तांनी सांगितले. प्रशिक्षण प्रमाणपत्राचा अवधी ३ डिसेंबर १९३१ असे दर्शविण्यात आले आहे. ब्रिटिशपूर्व काळ यात नमूद आहे. इतकेच नव्हे तर भारताची राजमुद्रेचा वापर प्रमाणपत्रावर केल्याचे स्पष्ट झाले.
प्रशिक्षणाच्या नावे २ कोटींचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 2:28 AM