सरासरीच्या ५० टक्केच पाऊस : दीड लाख हेक्टरमध्ये पिकांना मोडलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरिपात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत ४३ दिवसांत फक्त ५३ टक्केच पाऊस झाल्याने अद्याप अडीच लाख हेक्टरमध्ये पेरण्या रखडल्या आहेत. झालेल्या पेरणी क्षेत्रापैकी किमान दीड लाख हेक्टरमधील पिकांना मोड येऊन दुबार पेरणीचे संकट आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.केंद्र शासनाच्या जिल्हानिहाय पीक आराखडा ‘आयसीएआर’ या संस्थेने ‘सीआरआयडीए’ (सेंटर रिसर्च इंस्टिट्यूट फॉर ड्रायलँड अॅग्रीकल्चर) यापूर्वीच आराखडा तयार केलेला आहे. कृषी विद्यापीठानेदेखील आपत्कालीन पीक नियोजनाच्या शिफारशी केलेल्या आहेत. पाऊस वेळेवर सुरू न होने, पेरणीनंतर पावसात खंड पडणे, पाऊस लवकर संपणे आदी हवामानाच्या अनिश्चितीमुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थतीमध्ये शेतकऱ्यांनी पीक नियोजन करणे आवश्यक आहे. सार्वत्रिक स्वरूपाच्या कमी दाबाच्या पट्ट्यापासून मिळणारा पाऊस हा विदर्भात ढोबळमानाने एकाचवेळी पडतो. मात्र कमी दाबाचा पट्टा जेव्हा विदर्भात नसतो तेव्हा विदर्भातील पावसाच्या प्रमाणात तालुका व जिल्ह्यात मोठे बदल आढळून येतात. नियमितपणे पावसाळा सुरू होतो तेव्हा तीन दिवसांत विदर्भ व्यापतो. सर्वसाधारणपणे ११ ते १७ जून (२४ वा हवामान आठवडा) दरम्यान विदर्भात नियमित मोसमी पाऊस येतो. पावसाळा जर एक, दोन आठवडे उशिरा सुरू झाल्यास ही आपत्कालीन परिस्थिती गृहीत धरल्या जाते. अशा परिस्थितीत पीक नियोजनामध्ये, पिकांच्या वाणामध्ये, खत व्यवस्थापनामध्ये, तसेच रोपांच्या प्रतीहेक्टरी संख्येमध्ये बदल करावा लागतो. यासाठीच आपत्कालीन पीक नियोजन महत्त्वाचे आहे.पावसाळा दोन ते तीन आठवडे ऊशीरा सुरू झाल्यासपावसाळा दोन ते आठवडे ( २ ते १५ जुलै) उशीरा सुरू झाल्यास अमेरीकन तसेच देशी कपासीचे लवकर पक्व होणारे वाण वापरावेत.साधारणपणे २० टक्के बियाणे जास्त वापरावेत.सुधारित व संकरित वाणांच्या बाबतीत दोन झाडामधील अंतर कमी ठेवावे.मूग, सोयाबीन, उडीद पिकांचा आंतरपीक म्हणून वापर करावा.संपूर्ण क्षेत्रावर एकच आंतरपीक घेण्यापेक्षा थोड्या-थोड्या क्षेत्रावर ही आंतरपिके घ्यावीत. काही क्षेत्रात कापूस : ज्वारी : तूर या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, बियाणे जास्त वापरावेत. पावसाळा १६ ते २२ जुलै म्हणजेच चवथ्या आठवड्यात सुरु झाल्यास २५ टक्के बियाणे अधिक वापरावेत, तर खतांचा २५ टक्के कमी वापर करावा मूग, उडीदाची क्षेत्र कमी करावे किंवा टाळावे.
आपत्कालीन पीक नियोजनच तारणार
By admin | Published: July 14, 2017 12:38 AM