अमरावती : आज प्रत्येकजण आपल्या कुटुंबीयांसाठी, मुलांसाठी जगताे. पण काही मुलांच्या नशिबी हे सुख कायमचं हरवलेलं असते. असेच काही चार वर्षांच्या मतिमंद मुलासाेबत घडले. आई लहानपणी गेली. वडील कॅन्सरग्रस्त तेही शेवटच्या टप्प्यामध्ये. मतिमंद मुलाची जबाबदारी सांभाळण्यास नातेवाईकांचा संकाेच. अशातच श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने त्या मुलाची जबाबदारी स्वीकारत त्याला बालगृहाचा आधार दिला.
शेवटची भेट म्हणून वडील आणि मुलाची हाेत असताना आता मी तुला कधी पाहू शकेल की नाही? असे म्हणत वडिलांनी आपल्या चार वर्षांच्या मुलाला घट्ट कुशीत घेत टाहो फोडला. हा क्षण पाहताना अनेकांनी अश्रूंना वाट माेकळी करून दिली.
पती-पत्नी मूळचे मध्य प्रदेशातील; पण मागील अनेक वर्षांपासून नांदगाव पेठ येथे वास्तव्यास. माेलमजुरी करीत जागा मिळेल तेथे विसाव्या करणाऱ्या या दाम्पत्यास एक मुलगा झाला; मात्र ताे दिव्यांग आणि मतिमंद. मुलगा दाेन अडीच वर्षांचा असतानाच आईचे निधन झाले. हाताला जे काम मिळेल ते काम करून जीवन जगायचे असे सुरू असताना वडिलांना कँसर झाला. पुढे कॅन्सर वाढत गेला. आता आपले काही खरे नाही पण मुलाचे कसे या विवंचनेत असलेल्या वडिलांनी अखेर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाईल्ड लाईनला फोन करीत मदतीची मागणी केली.
श्री हव्याप्र मंडळाच्या हेल्पलाईनचे पदाधिकारी मुलाला लातूर येथे घेऊन जाण्यास तयार झाले. वडिलांची भेट घ्यायची हाेती म्हणून मुलाला वडिलाजवळ दिले. दाेघेही एकमेकांना बिलगले आणि काहीच क्षणात वडिलांनी टाहाे फोडला. 'आता तुझी भेट हाेईल की नाही' असे म्हणत वडील रडत हाेते; मात्र वडील रडत असल्याची संवेदना त्याला कळली होती. ताेही आपल्या वडिलांना घट्ट पकडून होता. हा क्षण पाहताना उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले हाेते. या अभियानाला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव माधुरी चेंडके, चाईल्ड लाईनचे संचालक डाॅ. नितीन काळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.