अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ विद्यार्थिकेंद्रित करण्याचा माझा मानस असून, त्यादृष्टीने विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढावे, विद्यार्थ्यांना संशोधन व शिक्षणपूरक जास्तीत जास्त सुविधा मिळाव्या, यासोबतच विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून नवनिर्मिती करण्यासाठी प्रेरित करण्याचा मानस असल्याचे नवनियुक्त कुलगुरू प्रा.डॉ. दिलीप मालखेडे यांनी व्यक्त केला.
विद्यापीठाचे आठवे कुलगुरू म्हणून राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. मालखेडे यांची निवड केली. गुरुवारी त्यांनी कुलगुरुपदाचा पदभार विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्याकडून स्वीकारला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे मावळते प्रभारी कुलगुरू डॉ. विलास भाले, मावळते प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे संबोधित करताना म्हणाले, विद्यापीठात दरवर्षी जवळपास पाच लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. यावरूनच विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे असल्याची प्रचिती येते. या विद्यापीठाचा कुलगुरू होणे माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण आहे. प्रत्येक विद्यापीठाचे व्हिजन, मिशन व ध्येय पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व इतर घटकांची यांची भूमिका महत्त्वाची असते. विद्यापीठातील मागील सात कुलगुरूंचा मी आदर करतो. त्यांनी विद्यापीठाची विकासात्मक प्रगती करून विद्यापीठाचे नावलौकीक केले. आजच्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी-विद्यार्थी, विद्यार्थी-शिक्षक व शिक्षक-शिक्षक यामध्ये मैत्री असणे आवश्यक असून, त्या माध्यमातून विद्यार्थी कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाबरोबरच तंत्रज्ञान विकास महत्त्वाचा असून त्या माध्यमातूनच विद्यार्थी घडत असतो. आपल्याला विद्यापीठात काम करण्याची संधी ही केवळ विद्यार्थ्यांची व पर्यायाने समाजाची सेवा करण्यासाठीच मिळाल्याची भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. प्रभारी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी कुलगुरुपदाचा कार्यभार नियुक्त कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांना हस्तांतरित करून त्यांचा शाल-श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार केला. कुलगुरूंचा परिचय व प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील भूमिका कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी मांडली. संचालन उपकुलसचिव डॉ. डी.आर. चव्हाण यांनी केले. यावेळी अधिकारी, सिनेट, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.