अमरावती : गृह विलगीकरणाला शक्यतो परवानगी देऊ नये. आवश्यक परिस्थिती असेल, तरच परवानगी द्यावी. यापुढे संस्थात्मक विलगीकरणावरच भर द्यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आरोग्य यंत्रणांना बुधवारी दिले.
संक्रमित रुग्ण जर नियमांचे पालन करत नसल्यास, त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. झोन अंतर्गत चाचण्या वाढविण्यात याव्या, या संदर्भात सहायक आयुक्तांनी लक्ष द्यावे. सुपर स्प्रेडरला तपासणीकरीता सूचित करावे. झोन स्तरावर कंटेन्मेंट झोन तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. विवाह समारंभ येथे उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. जे नियमाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर इनकॅमेरा दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
संस्थात्मक विलगीकरणासंदर्भात आयुक्तांनी आढावा बैठक घेतली. यावेळी उपायुक्त सुरेश पाटील, सहायक संचालक नगर रचना आशिष उईके, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, भाग्यश्री बोरकर, नगर सचिव मदन तांबेकर, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, अतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, पशू शल्यचिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत, बाजार व परवाना अधीक्षक उदय चव्हाण, उपअभियंता श्यामकांत टोपरे, डॉ. अजय जाधव, डॉ. मानसी मुरके उपस्थित होते.
------------
विमवि क्वारंटाईन सेंटरचे काम सुरू
विमवि क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. बांधकाम व प्रकाश विभागाने संयुक्त पाहणी करून ते सेंटर त्वरित सुरू करण्याचे निर्देश आयुक्त रोडे यांनी दिले. सर्व कर्मचाºयांंनी लस घेऊन तशी माहिती विभागप्रमुखाला द्यावी व विभागप्रमुखांनी आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.