तळेगाव दशासर : स्थानिक पोलीस ठाणे चौकात घाणीचे साम्राज्य पसरल्याने पोलीस कर्मचारी तसेच या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्राथमिक उर्दू शाळा, पोलीस ठाणे, जुनी जिल्हा परिषद शाळा, हॉटेल आदी गजबजलेले ठिकाण असूनसुद्धा येथील साचलेल्या घाणीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. परिणामी यामधून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. याबाबत ग्रामपंचायतला वारंवार सूचनाही देण्यात आल्या. सध्या सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यासोबतच बिमारीने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. सर्दी, खोकला, ताप, मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांची परिसरात सुरुवात झाली आहे. याआधी गावात डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे या गंभीर बाबीकडे प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. प्रशासनाने गावातील कचरा उचलून प्रत्येक वाॅर्डात जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी गावातील नागरिक करीत आहेत.