लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यसेवेत सन २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, या मागणीसाठी मुंबई येथून राज्यभर निघालेल्या जुनी पेन्शन संघर्ष यात्रेचे रविवारी अमरावती येथे जोरदार स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीच्यावतीने पेन्शन संघर्ष सभा पार पडली. आता आरपारची लढाई लढू, असा एकमुखी निर्णय या सभेत घेण्यात आला. व्यासपीठावर जुनी पेन्शन समन्वय समितीचे राज्य संयोजक विनेश खांडेकर, राज्य सचिव गोविंद उगले, आमदार सुलभा खोडके, मधुकर काठोळे, आशुतोष चौधरी, प्राजक्त झावरे-पाटील, शैलेश भदाणे, जिल्हा समन्वयक गौरव काळे, शेखर भोयर, संगीता शिंदे, दीपिका एरंडे, पंकज गुल्हाने, किरण पाटील, गोकुलदास राऊत, सुनील केचे, उमेश गोदे, संजय भेले, अशोक कुऱ्हाडे, प्रज्ज्वल घोम आदी उपस्थित होते. गौरव काळे यांनी प्रास्ताविक व संचालन केले. प्राजक्ता मशीदकर यांनी आभार प्रदर्शन केले.
लढ्यासाठी तयार राहाजुन्या पेन्शनसाठी आता मागे हटणार नाही. या लढ्यात गोळ्या, लाठ्या-काठ्या खाण्याचीही तयारी आहे. या निर्णायक लढ्यासाठी कर्मचाऱ्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन जुनी पेन्शन समन्वय समितीचे राज्य संयोजक विनेश खांडेकर यांनी केले.
संघर्ष करा : सुलभा खोडकेसंघर्षयात्रेला नक्कीच यश मिळेल. मी तुमच्यासोबत आहे, असा विश्वास आ. सुलभा खोडके यांनी दिला. तुमचा प्रश्न हा माझा आहे. विधिमंडळात जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी पुढाकार घेईल, असे त्या म्हणाल्या.