वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात चांगलीच मोकळीक देण्यात येत असल्याचे आढळून येत आहे. नातेवाईक कैद्यांशी भेटीगाठी घेऊन पैसा, खर्रा, गुटखा पुड्यांसह आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक हजारावर बंदी असून, त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यास, तेथेच उपचाराची सुविधा आहे. मात्र, काही मोजक्या कैद्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात कारागृह, शहर व ग्रामीण पोलीस मुख्यालयातील काही पोलीस गार्डच्या संरक्षणात आणले जाते. कैद्यांची इर्विन रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलीस चौकीत बसविले जाते. तेथे कैद्यांच्या नातेवाइकांच्या भेटीगाठी होतात. कैद्यांना पैसा, खर्रा, गुटखासारख्या पदार्थांचा पुरवठा केला जातो. हे प्रकार कोणाच्या नजरेस पडू नये, यासाठी पोलीस दाराजवळच पहारा देतात. त्यामुळे कैद्यांना ही सुविधा पुरविण्यात पोलिसांचे संगमनत असण्याची शक्यता आहेच. इर्विन चौकीतील पोलीस हे प्रकार पाहून अचंबित होतात. कैद्यांच्या अशाप्रकारे भेटीगाठी होऊ नयेत, याविषयी ते बोलतात. गुन्हेगारांना शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात ठेवले जाते; मात्र त्यांना अशाप्रकारे मुभा दिली जात असेल, तर ही बाब जनसामान्यांच्या दृष्टीने घातक ठरू शकते. गुन्हेगारीविषयी त्यांचे धाडस आणखी वाढण्याचीच शक्यता आहे. कारागृहात असतानाही सर्व काही करता येऊ शकते, अशी भावना गुन्हेगारांमध्ये बळावण्याचीही शक्यता लक्षात घेऊन असले प्रकार थांबवून त्यांना मदत करणाऱ्यांवरही जरब बसविण्याची गरज आहे. कारागृह प्रशासनासह पोलीस आयुक्त तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे लक्ष देतील का, याकडे आता जनसामान्यांचे लक्ष लागले आहे.न्यायालय परिसरातही चालतात भेटीगाठीमध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी आणले जाण्याच्या वेळी नातेवाईक भेटीगाठी घेतात. उपस्थित पोलिसांच्या लपून कैद्यांना काही-बाही देतात. त्यात पैशांसह खर्रा, गुटखाजन्य पदार्थसुद्धा दिला जातो. काही दिवसांपूर्वी एका कैद्याला गांजा पुरविण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीस पोलिसांनी पकडले होते.कारागृहातून कैद्यांना पोलीस मुख्यालयातील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले जाते. असे प्रकार होत असल्यास ते गंभीर आहे. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक किंवा शहर पोलीस आयुक्तालय अधिकार क्षेत्रातील आहे. त्यांनी दखल घ्यावी.- योगेश देसाई,उपमहानिरीक्षक, कारागृह प्रशासन.
कारागृहातील कैद्यांना इर्विन रुग्णालयात मोकळीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 10:01 PM
जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात चांगलीच मोकळीक देण्यात येत असल्याचे आढळून येत आहे. नातेवाईक कैद्यांशी भेटीगाठी घेऊन पैसा, खर्रा, गुटखा पुड्यांसह आवश्यक त्या साहित्याचा पुरवठा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.
ठळक मुद्देनातेवाईकांच्या भेटीगाठी : पैसे, खर्रा, गुटखा पुड्यांचा पुरवठा