सुप्रीम कोर्टाचे निर्देश : ठाणेदाराच्या उपस्थितीत कारवाईबडनेरा : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मंगळवार ९ आॅगस्ट रोजी बडनेऱ्यातील अतिक्रमित धार्मिकस्थळे जमीनदोस्त करण्यात आली. ठाणेदार व एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शांततेच्या वातावरणात कारवाई पार पडली. बडनेऱ्यातील नवीवस्ती परिसराच्या मिलचाळ झोपडपट्टी जवळ असणाऱ्या चार धार्मिक स्थळांचे अतिक्रमण पाडण्यात आले. यात दोन हनुमान मंदिर एक शिवमंदिराचा ओटा व एका मशिदीचा समावेश आहे. बडनेरा शहरात मंगळवारी दिवसभर ही कार्यवाही पार पडली. शहरात एकूण १५ ठिकाणी धार्मिके स्थळांचे अतिक्रमण आहेत. या कार्यवाहीत केवळ महानगर पालिकेचा एक जेसीबी वापरण्यात आला. आदल्या दिवशी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडून बडेनरा पोलिसांना सदरचे अतिक्रमण पाडण्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक डी.एम. पाटील व प्रकाश सरगिवे नामक पोलीस कर्मचारी या दोघांच्या उपस्थितीत अतिक्रमण मोहीम पार पडली. ठाणेदारांनी आदल्या दिवशी या परिसरातील नागरिकांची पोलीस ठाण्यात बैठक बोलाविली होती. त्यात ठरल्यानुसार ही मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे मोहिमेदरम्यान महापालिकेचे कर्मचारी उपस्थित नव्हेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अतिक्रमित धार्मिक स्थळे पाडण्यात येणार असल्याचे ठाणेदारांनी नागरिकांना समजावून सांगितल्याने कोणताही गोंधळाशिवाय नागरिकांच्या यावेळी सामंजस्यातून ही मोहीम शांततेत पार पडली. ठाणेदाराने याप्रकरणी नागरिकांचे आदल्या दिवशीच योग्य प्रकारे समुपदेशन केल्याने मोहिमेत कोणतीही अडचण उद्भवली नाही.
बडनेऱ्यातील अतिक्रमित धार्मिकस्थळे जमीनदोस्त
By admin | Published: August 09, 2016 11:58 PM