१५० चा प्रस्ताव : घरकुल योजनेचा लाभ
चिखलदरा : चिखलदरा पर्यटनस्थळावरील नगर परिषद हद्दीत राहणाऱ्या अतिक्रमणधारकांना त्यांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासह घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ९६ नागरिकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात आले, तर १५० नागरिकांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
‘सर्वांसाठी घरे’ या शासनाच्या ६ मार्च २०१९ निर्णयानुसार चिखलदरा हद्दीतील वनजमीन वगळता अतिक्रमणधारकांनाचे अतिक्रमण जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केले. त्यामध्ये मरियमपूर, गवळीपुरा व पांढरी या तीन प्रभागांचा समावेश आहे. १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी निवासी प्रयोजनासाठी केलेल्या एकूण १५० अतिक्रमणांच्या नियमानुकूलनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यावर प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याची माहिती चिखलदरा नगरपालिकेच्या तांत्रिक तज्ज्ञ पूजा कपले यांनी दिली.
बॉक्स
१७ घरकुलाचे बांधकाम पूर्ण
चिखलदरा नगर परिषद हद्दीतील पीएमएवाय योजनेंतर्गत बीएलसी घटकांमध्ये ३० लाभार्थींचा प्रस्ताव घरकुलासाठी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी १७ लाभार्थींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ३१ लाभार्थींचा दुसरा डीपीआर केंद्र शासनाला पालिकेच्या वतीने मंजुरीकरिता पाठविण्यात आला आहे. पालिका हद्दीतील मरियमपूर क्षेत्रातील काही नागरिकांचे येथील वास्तव्य ७० वर्षांपेक्षा जुने असून, या क्षेत्रात १८५ कुटुंबे आहेत. त्यापैकी ३८ नागरिकांचे अतिक्रमण जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नियमानुकूल केले आहे. जे नियमानुकूल करणे शक्य नाही, त्याकरिता नगर परिषदेच्यावतीने बरमपूर येथील आवास उपलब्ध करण्यासाठी महसूल प्रशासनाकडे शासकीय जागेची मागणी करण्यात आली आहे.
कोट
पालिका क्षेत्रातील गोरगरीब नागरिकांनी निवासासाठी अतिक्रमण केले होते. शासननिर्णयानुसार त्यांना घरकुलाचा लाभ दिला जात आहे. ९६ नियमानुकूल झाले. १५० नागरिकांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे.
- विजया सोमवंशी, नगराध्यक्ष, चिखलदरा