अमरावती : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात येणार्या चिलमछावणी, राजीव गांधीनगर, चमन शाहवली या ठिकाणी सन १९८६ पासून वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांचे अतिक्रमण हटवू नये, यासाठी या परिसरातील शेकडो नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. सन १९८६ सालापासून शहरातील चिलमछावणी, राजीव गांधीनगर, चमन शाहवली या परिसरातील झोपडपट्टीमध्ये मोलमजुरी करुन सुमारे ५00 नागरिक वास्तव्य करीत आहेत. महसूल विभागाच्या नझुल शिट क्रमांक ७, प्लॉट नं. २/४ या नझूलच्या जागेवर राहणार्या वरील गोर गरीब कुटुंबांना शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. मात्र ऐन पावसाळ्याच्या तोंडावर प्रशासनाने ही कारवाई सुरु केल्यामुळे चिलमछावणी परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. शासनाने सुमारे ३0 वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या या झोपडपट्टीतील नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यावा त्यानंतरच येथील अतिक्रमण काढण्यात यावे. प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची नोटीस बजाविल्याने मोल मजुरी करुन वास्तव्य करीत असलेल्या या गरीब जनतेने निवार्याचा आश्रय कोठे घ्यावा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासन गरिबांना निवार्याची सुविधा व्हावी म्हणून घरकुलाची योजना राबवितो; मात्र याचा लाभ गरजूंना मिळत नाही. बाब लक्षात घेऊन शासनाने अगोदर झोपडपट्टीतील या नागरिकांना राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन द्यावी. कुठल्याही परिस्थितीत या परिसरातील अतिक्रमण हटवू देणार नाही या विषयासाठी चिलमछावणी परिसरातील सुमारे ५00 नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. उपोषणकर्त्यांमध्ये अफजल भाई, शफीक राजा, शाहीस्ता परवीन, शेख जाकीर, गफ्फार खां, शेख फारूख, शेख युसूफ, शेख सुभान, आशा कोबळे, शेख जावेद आदींसह परिसरातील नागरिकांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
अतिक्रमण कारवाई, नागरिक रस्त्यावर
By admin | Published: May 30, 2014 11:22 PM