पथक निद्रिस्त : आयुक्त घालतील का लक्ष ?अमरावती : संपूर्ण महापालिका क्षेत्रात निवडणुकीचे वारे वाहत असताना अतिक्रमणधारकांनी तोंड वर काढले आहे. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकाने घेतलेली धृतराष्ट्राची भूमिका आहे. त्यामुळे हा विभाग कार्यरत आहे की नाही, असा सवाल उपस्थित करणारी ठरली आहे. अतिक्रमण विभागावर महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. ट्रक, बुलडोजरसह कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासह आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. तथापि या पथकाकडून किंवा विभागाकडून अतिक्रमण निर्मूलनाचे अपेक्षित काम होत नाही. तूर्तास तर परप्रांतीय लोकांनी ज्यूसविक्रीसाठी गर्दीचे रस्ते व्यापले असताना त्यांना रान मोकळे करून दिले आहे. त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने व संबंधितांची महिन्याकाठी घसघशीत कमाई होत असल्याने अतिक्रमित मुजोर झाले आहेत. रस्त्याच्या अर्ध्या भागासह संपूर्ण फूटपाथ या अतिक्रमणधारकांनी कवेत घेतला असताना ‘कुत्तरमारे आणि टिमने’ त्याकडे केलेले दुर्लक्ष अनेक प्रश्न उपस्थित करणारे ठरले आहे. अमरावतीकरांच्या खिशातून कररूपाने येणाऱ्या पैशातून अतिक्रमण विभागाचा डोलारा सांभाळला जातो. मात्र हा विभाग नेमका काय करतो आहे, हे एककोडेच आहे. मागील एक महिन्यापासून अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई थंडबस्त्यात असल्याने या पथकाविषयीच शंकेचे काहूर उठले आहे. सीएम किंवा एखाद्या मंत्र्यांचा दौरा असला की, तोंडदेखली कारवाई करायची आणि त्यानंतर पुढचे पाढे ५५ अशी महापालिका अतिक्रमण विभागाची स्थिती झाली आहे. शहरातील अतिक्रमणे सुसाट झाली आहेत. जीवघेणे अतिक्रमणशहराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारचे कोषागार कार्यालय, आरटीओ परिसर, राजकमल, श्याम, चित्रा, सरोजसह गांधी चौक, बसस्थानक रस्ता या ठिकाणी जीवघेणे अतिक्रमण डोके वर काढले असताना तेथील अतिक्रमणात पडलेली भर संतापजनक आहे. थोड्याशा चिरीमिरीसाठी महापालिकेने अमरावती नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. थंडपेयवाल्यांची मुजोरीजिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील टेलिफोन भवनाच्या बाजूला अगदी राजरोसपणे सरकारी जागेवर अतिक्रमण करून लस्सीवाल्यांनी दुकानदारी थाटली आहे. याच भागात नव्हे, तर शिवटेकडी भागात तर या परदेशी लस्सी, ज्यूसवाल्यांनी महापालिकेला आव्हान देत राजरोसपणे मुजोरी सुरू केली आहे. अपघात झाल्यावरच येईल का जाग?जि.प. विश्रामगृहालगत दिवसाढवळ्या सरकारी नियमाच्या चिंधड्या उडविल्या जात असताना या भागातील अतिक्रमण, नाश्तावाल्यांच्या गाड्या उचलण्याचे सौजन्य कुत्तरमारे आणि टिमला अद्यापही सुचलेले नाही. नाश्ता करण्यास येणाऱ्यांची शेकडो वाहने या भागात अस्ताव्यस्त पार्क केली जात असताना वाहतूक शाखासुद्धा अपघाताची वाट पाहत आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
शहरात अतिक्रमण सुसाट...
By admin | Published: February 20, 2017 12:09 AM