धारणी : शहरातील अतिक्रमणापाठोपाठ आता शहराला लागून असलेल्या वन तपासणी नाक्याजवळील तलाई कॅम्प येथील सर्व्हे नंबर १३२ मध्ये रस्त्यांवर अतिक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. स्वत:चे घर बांधल्यानंतरसुद्धा शासकीय रस्त्यांची जागा गिळंकृत करण्याचा प्रकार येथे सर्रास सुरु आहे. याकडे दिया ग्रामपंचायतीचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्यामुळे भविष्यात अरुंद वाटेत बंदिस्त होण्याची वेळ नागरिकांवर येणार आहे.
दिया ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शहरातील कॅम्प भागातील विकासाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सर्व्हे नंबर १३२ हे शासकीय लेआऊट असून, त्यालगत उत्तरेकडे खासगी ले-आऊट आहे. ग्रामपंचायतद्वारे विकासकामे खासगी लेआऊटमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते आणि नाल्यांचे मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे. मात्र, शासकीय ले-आऊटमधील सर्व्हे नंबर १३२ विकासापासून कोसोदूर आहे. या ले-आऊटचे नियोजन बरोबर केले नसल्यामुळे बांधकामांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे.
लोकांनी अवाढव्य जागा कब्जात घेऊन त्यांना मिळालेल्या शासकीय जागेपेक्षा जास्त जागेवर भव्य इमारत बांधल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. याकडे महसूल विभागासह दिया ग्रामपंचायतीकडून कारवाईची अपेक्षा आहे.