पान २ चे लिड
जुळ्या शहरातील रस्त्यांचा जीव गुदमरतोय, क्रेन जेसीबीच्या दहशतीने नागरिक भयभीत
नरेंद्र जावरे
परतवाडा : परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरातील रस्त्यांवर वाढते अतिक्रमण, जड वाहतूक, बेदरकार ट्रक, अरुंद रस्त्यांवर भरधाव धावणाऱ्या क्रेन, जेसीबीमुळे शहरातील नागरिक अपघाताच्या भीतीने कमालीचे दहशतीखाली आले आहेत. दुसरीकडे सर्वत्र अतिक्रमण झाल्याने रस्त्यांचा जीव गुदमरत असल्याचे चित्र आहे.
परतवाडा शहरातून अमरावती इंदूर, अकोला, बैतुल असा राज्य व आंतरराज्य महामार्ग गेला आहे. वाहतुक कोंडी होऊ नये याकरिता हे चौपदरीकरण करण्यात आले. चांदूरबाजार नाका, मिलकॉलनी स्टॉप, जयस्तंभ चौक ते अंजनगाव चिखलदरा बैतुल स्टॉपपर्यंत रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्याने पूर्वीचे रस्ते अरुंद झाले. दुसरीकडे बसस्थानक ते बैतुल स्टॉपपर्यंत खाजगी बस व जड वाहतूक करणारे ट्रक, ट्रेलर उभे राहतात. त्यामुळे रस्त्यावरील दुचाकी व पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. यासंदर्भात नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व आंतरराज्य महामार्ग प्राधिकरण पूर्णत: दुर्लक्ष करीत आहे. हा सर्व प्रकार मोठ्या अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे.
बॉक्स
क्रेनही भरधाव
परतवाडा-अचलपूर शहराला लागून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहे. शेकडोंच्या संख्येने नागरिक शहरात दाखल होतात. त्यामुळे दिवसभर शहरातील रस्ते नागरिकांनी फुललेले दिसतात. अशाच काही दिवसांपासून दिवसा-रात्री क्रेन आणि जेसीबीधारक मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने धावत असल्याचे चित्र आहे.
अतिक्रमणाच्या नावावर बेरोजगारांची हकालपट्टी
जुळ्या शहरात शेकडोंच्या संख्येने ठिकठिकाणी हातठेल्यावर खाद्यपदार्थ, पालेभाजी, चहा, पानटपरी, फळ, कापड विक्री व इतर साहित्य विक्री करणारे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अतिक्रमण मोहिमेदरम्यान प्रशासनाच्यावतीने त्यांची सर्वप्रथम हकालपट्टी केली जाते. शासकीय जागेवर अतिक्रमणधारकांवर कुठल्याच प्रकारे कारवाई केली जात नाही. प्रशासनाचा हा दुजाभाव बेरोजगारांमध्ये संताप व्यक्त करणारा ठरतो.
बॉक्स
पादचाऱ्यांनी चालावे कसे?
शहरात आंतरराज्य महामार्ग करताना रस्त्याच्या दुतर्फा सहा फूट रुंदीचे फुटपाथ तयार करण्यात आले. बाजार समिती ते बैतुल स्टॉपपर्यंत शहरातील हे फुटपाथ चोरीला गेल्याचे चित्र आहे. त्यावर दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. प्रशासनाने किमानपक्षी फुटपाथ मोकळे करण्याची मागणी होत आहे.