शॉक लागून झाला मृत्यू : पालिकेची मालमत्ता अतिक्रमणधारकांच्या ताब्यातचांदूरबाजार : चांदूरबाजार येथील नगरपरिषदेच्या मालकीची चांदूरबाजार-मोर्शी मार्गावरील हिंदू स्मशानभूमीच्या मागे मोठ्या प्रमाणात खुली जागा आहे. या जागेवर मागील काही दिवसांतच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून याच अतिक्रमणधारकांनी आता विजेचा पुरवठाही घेतला तो अवैधच. चांदूरबाजार नगरपालिकेच्या स्वत: मालकीच्या खुल्या जागेवरील नागरिकांचे वाढते अतिक्रमण थांबता थांबेना तर दुसरीकडे नगरपालिका हद्दीतील ले-आऊट परिसरातील खुल्या जागेचे वादही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशात नगरपालिकेची जागा हडप करणाऱ्या अतिक्रमणधारकांविरुद्ध कारवाई थंडबस्त्यात असल्याने नगरपरिषदेचा कोट्यवधी रूपयांची जागा हडपून ती विकण्याचा व्यवसाय फोफावला आहे. अशा दलालांना सध्या सुगीचे दिवस आल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.अशीच एक नगरपालिकेच्या मालकीची खुली जागा मोर्शी मार्गावरील हिंदू स्मशानभूमीच्या मागील बाजूस होती. ही जागा त्या परिसरात वास्तव्य करून राहणाऱ्या ख्रिश्चन समाज बांधवांनी दफन विधी कार्यासाठी रीतसर नगरपालिकेला अर्ज करून मागितली होती. मात्र ती जागा ख्रिश्चन बांधवाना दफनविधीसाठी देण्यात आली नसून त्याच जागेवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून राहण्यास सुरूवात केली आहे. नगरपालिकेची कोट्यवधी रूपयांची जागा सद्यस्थितीत अतिक्रमणधारकांच्या ताब्यात आहे. त्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात झोपड्या उभारून राहणाऱ्या नागरिकांनी आता आपल्या घरात वीज पुरवठाही घेतला आहे. तो देखील अवैधरीत्याच. नगरपालिकेच्या या खुल्या जागेलगतच हिंदू मोक्षधाम असून मोक्षधामच्या संरक्षण भिंतीच्या सहारे वायर अंथरुन हा अवैध वीजपुरवठा येथील अतिक्रमणधारकांनी घेतला आहे. पूर्वी याच परिसरात विजेचा धक्का लागून एका नागरिकाचा मृत्यू झाला. आता पुन्हा वीज वितरण कंपनीच्या जिवंत वाहिन्यांतून थेट वीजपुरवठा होत असल्याने हिंदू स्मशानभूमीच्या ओल्या भिंतीत लिकेज असल्याने विजेचा शॉक लागून त्या परिसरात पुन्हा एखादी घटना घडू शकते. वीज वाहिन्यांवर योग्य उपाययोजना न केल्यास अप्रिय घटना घडू शकते. (तालुका प्रतिनिधी)
अतिक्रमणधारकांनी घेतली अवैध वीज
By admin | Published: September 01, 2015 12:06 AM