कारवाई : बडनेऱ्यात मिरा दातार दर्गा परिसरात महापालिकेची कारवाई बडनेरा : येथील दातार बाबा दर्ग्यासमोरील मार्गावरचे अतिक्रमण बुधवारी महापालिकेच्या पथकाने हटविले. याकारवाईत पक्क्या घरांसह दुकानांचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. कारवाईदरम्यान बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अनेक वर्षांपासूनचे हे अतिक्रमण हटविल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिम पथकाने तीन दिवसांपूर्वी मीरा दातार बाबा दर्ग्यासमोरुन जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीसेस दिल्या होत्या. अनेकदा येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी होती. मात्र, मनपा प्रशासनाने आता कुठे त्याची दखल घेऊन ८ फेब्रुवारी रोजी यामार्गावरचे अतिक्रमण हटविले. मोठ्या प्रमाणात येथे अतिक्रमण करण्यात आले होते. खुद्द मीरा दातार बाबा दर्ग्यासमोर अगदी रस्त्यावरच भले मोठे टीनाचे शेड उभारण्यात आले होते. दातार बाबांचा मोठा भक्तवर्ग आहे. लांबवरून इलाज करण्यासाठी येथे रूग्ण येत असतात. गर्दीचा फायदा उचलत अनेकांना या रस्त्यावर दुकाने थाटली होती. पक्की घरे बांधली होती. हा रस्ताच गिळंकृत करण्यात आला होता. भाविकांसह रूग्णांसह तसेच परिसरवासीयांना येथून येणे-जाणे देखील कठीण झाले होते. या कारवाईत मनपाचे सहायक आयुक्त योगेश पिठे, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, अतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, अभियंता नितीन बोबडे, स्वास्थ अधिकारी एकनाथ कुळकर्णी, उमेश सवई, पोलीस उपनिरीक्षक जामनेकर इतर पोलीस व मनपाचे कर्मचारी सहभागी होते. अर्धवट कारवाईमुळे नागरिकांमध्ये चर्चामनपा प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहीम पथकाकडून २० अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. यापैकी अर्धे अतिक्रमण हटविण्यात आले. मनपा प्रशासनाने कारवाई पूर्ण करावी, अशी चर्चा याठिकाणी होती. या रस्त्यावरुन चालणे देखील कठीण झाले होते. चक्क रस्त्यावर पक्की घरे व दुकाने थाटण्यात आली होती. अजुनही बरेच अतिक्रमण ‘जैसे थे’च आहे. महापालिका सामुदायिक शौचालय उभारणारमीरा दातार बाबा दर्गा रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर या परिसरात स्वच्छता अभियानांतर्गत मनपा प्रशासनाकडून सामुदायिक शौचालय उभारणार असल्याचे एक अधिकाऱ्याने सांगितले. लांबून येणाऱ्या भाविकांसह रुग्णांसाठी शौचालयासाठी व्यवस्था नसल्याने या परिसरात मनपाकडून महिला व पुरुषांसाठी शौचालय उभारले जाणार आहे. यामुळे नागरिकांची सोय होईल.
दर्ग्यासमोरील अतिक्रमण हटविले
By admin | Published: February 09, 2017 12:14 AM