अमरावती : राज्य परिवहन महामंडळातील अमरावती विभागातून मे आणि जून या दोन महिन्यांत एकूण ३१ कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे कार्यरत इतर कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येणार असून, ताण कमी करण्यासाठी इतरांना संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामुळे एसटी महामंडळच नव्हे, तर अन्य विभागांतील रिक्त जागांसाठी पदभरती केव्हा होणार, असा प्रश्न बेरोजगार उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे.
गत एक वर्षापासून लॉकडाऊन व अन्य कारणांमुळे अनेक तरुण बेरोजगार बनले आहेत. अनेकांच्या उपजीविकेचे साधनच बंद झाले आहे. त्यामुळे अनेक तरुणही आता स्पर्धा परीक्षा आणि शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच शासनाच्या विविध विभागांमध्ये अनेक जागा रिक्त होत आहेत. या जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात व बेरोजगार तरुणांना या माध्यमातून रोजगार द्यावा, अशी मागणी तरुणांकडून होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती विभागात मे महिन्याअखेर १० कर्मचारी निवृत्त होणार आहेत. जून महिन्याअखेर २१ कर्मचारी निवृत्त होणार आहेत. यात वाहक, चालक आणि अन्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांवर शासनाने तातडीने नोकरभरती घेऊन बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.