केंद्र सरकारचे पत्र, बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, वनविभागासह पशुसंवर्धन, आरोग्य विभागात ‘अलर्ट’
अमरावती : पुणे जिल्ह्यातील भिगवन येथील उजनी जलाशयावर स्थलांतरित पक्षी चिमणशेंद्रा व चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील तलावावर पानकावळा हा स्थानिक पक्षी गुरुवारी मृतावस्थेत आढळले. त्यामुळे विदेशी स्थलांतरित पक्ष्यांमुळे जलाशयावर स्थानिक पक्ष्यांच्या जिवाला व्यक्त होत आहे. यासंदर्भात वनविभाग, पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने ‘अलर्ट’ जारी केला आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि पर्यावरण बदल, वन्यजीव विभागाने ३ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेल्या तातडीच्या पत्रानुसार, मृत पक्ष्यांच्या नमुन्यात एच ५ एन १ एव्हियन एन्फ्ल्यूएंझाचे विषाणू आढळले. परदेशातून आलेल्या पक्ष्यांमुळे बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. त्यांच्याकरवी स्थानिक पक्ष्यांतही ही लक्षणे आढळू शकतात, असे म्हटले आहे. पोल्ट्री कारभारावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार
जिल्हा पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी संबंधित विभागप्रमुखांची तातडीची बैठक घेऊन उपाययाेजना करण्याबाबत निर्देश दिले.
---------------
उत्तरेकडील देशांतून आले जिल्ह्यात स्थलांतरित पक्षी
जिल्ह्यात ५७, तर अमरावती शहरालगत २३ जलाशये आहेत. मंगोलिया, चीन, युरोप, तिबेट या उत्तरेकडील देशांतून स्थलांतरित पक्षी हिवाळ्यात येथे वास्तव्यास आले आहेत. दरवर्षी तीन ते चार महिने त्यांचा मुक्काम असतो. उन्हाळ्याची चाहूल लागताच हे परदेशी पक्षी स्वगृही परततात. यात पद्मकदम, चक्रवाक, नकटा बदक, थापट्या बदक, चक्रांग, मोठी लालपरी, राजहंस, करकोचा, पाणकावळा, काळा ढोक, सुंदर बटवा, चिमणशेंद्रा, चम्मच चोचा आदी स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश आहे.
------------------
१४ तालुक्यांत ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’
परदेशी स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आल्याने जिल्ह्यात आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून १४ तालुक्यांत ‘रॅपिड ॲक्शन फोर्स’ गठित करण्यात आली आहे. या बर्ड फ्लूचा पोल्ट्री
कारभारावर कोणताही परिणाम होणार नाही, असे जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी विजय रहाटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. परदेशी मृत पक्षी आढळल्यास त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले जातील. कुक्कुटपालन व्यावसायिकांना सुरक्षा प्रदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोल्ट्री फार्ममध्ये कपडे धुण्याचा (कॉस्टिक) साेडा वापरण्याचे कळविले आहे, असे ते म्हणाले.
--------------------
परदेशी स्थलांतरित मृत पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे आढळून आले. तथापि, जिल्ह्यात एकही पक्षी मृत आढळून आलेला नाही. वनकर्मचारी, पक्षिमित्रांनी जलाशयावर वावर करताना सावधगिरी बाळगावी.
- जयंत वडतकर, पक्षी अभ्यासक.
--------------
मृत पक्ष्यांच्या नमुन्यात एच ५ एन १ एव्हियन एन्फ्ल्यूएंझा आढळल्यास त्या पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी लागेल, अशा केंद्र सरकारच्या गाईडलाईन आहेत. आता सतर्कता, सुरक्षिततेला प्राधान्य असेल.
- यादव तरटे पाटील, पक्षिमित्र.
----------------------