अमरावती : लहानपणापासूनच तल्लख असलेल्या प्राची सुनील उदासी हिला इंजिनिअर होऊन आयआयटीमध्ये जायचे आहे. दहावीच्या परीक्षेत ९८.६० टक्के गुण प्राप्त करून तिने जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला. तिच्या यशाचे गमक जाणून घेण्याकरिता लोकमतने तिच्याशी संपर्क साधला असता सेल्फ स्टडीवर भर दिल्याचे तिने सांगितले.भंवरीलाल सामरा इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी प्राची ही साईनगरातील रहिवासी सुनील उदासी यांची कन्या आहे. सुनील उदासी हे औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या उपसंचालकपदावर कार्यरत आहेत. आई नैना, मोठी बहीण प्रियंका असे तिचे कुटूंब. गुणवत्ता यादीत यायचेच, हे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून प्राचीने नियमित अभ्यास केला. दरम्यान, तिने स्वत:च्या अभ्यासकक्षातील फळ्यावर ९८.६० टक्के गुण मिळविण्याचे लक्ष्य खडूने कोरून ठेवले होते. त्यासाठी तिने प्रचंड परिश्रम घेतले आणि ठरविलेले लक्ष्य प्राप्त केले. प्राची म्हणते तिला शाळेतच उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाल्याने तिने खासगी शिकवणी लावली नव्हती. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांकडून चांगले मार्गदर्शन मिळाल्याचे ती आवर्जुन सांगते. पहिलीपासूनच प्राचीने वर्गातील प्रथम क्रमांक कधी सोडला नाही. दहावीतही ‘टॉप’ करून तिने ही परंपरा कायम ठेवली. प्राची ही कथ्थक नृत्यप्रकारात विशारद असून ती खूप छान कविता देखील लिहिते. इतकेच नव्हे तर प्रजापिता ब्रह्माकुमारी येथे ती ध्यान साधनादेखील करते. या ध्यानसाधनेमुळे एकाग्रता निर्माण होऊन तिला यश मिळविता आले, असे ती सांगते. प्राचीला भविष्यात अभियांत्रिकीमध्ये पदवी घेऊन पुढे आयआयटीला प्रवेश घ्यायचा आहे.
प्राचीला व्हायचंय 'इंजिनिअर'
By admin | Published: June 06, 2016 11:59 PM