अमरावती : २८ नोव्हेंबरच्या रात्रीपासून घरून बेपत्ता असलेल्या २८ वर्षीय अभियंता तरुणीचा मृतदेह ३ डिसेंबर रोजी सकाळी घराच्या टेरेसवर असलेल्या वॉटर टँकमध्ये आढळला आहे. ही धक्कादायक घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रत्नप्रभा कॉलनीमध्ये उघड झाली.
अश्विनी गुणवंतराव खांडेकर (२८) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. अश्विनी २८ नोव्हेंबरपासून घरून बेपत्ता होती. घरातून निघण्यापूर्वी मैत्रिणीकडे जाते, असं तिने सांगितले होते. मात्र मैत्रिणीकडे कुटुंबीयांनी शोध घेतला असता ती मैत्रिणीकडे नसल्याचे समोर आले होते. दरम्यान त्याच दिवशी अश्विनीचा भाऊ आशिष यांनी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून अश्विनी बेपत्ता असल्याबाबत तक्रार नोंदवली होती. त्यामुळे चार दिवसापासून कुटुंबीय आणि पोलीस अश्विनीचा शोध घेत होते.
दरम्यान शनिवारी सकाळी कुटुंबीयांना पाण्यातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले, त्यामुळे कुटुंबीयांनी टेरेसवर असलेल्या वॉटर टॅंकमध्ये जाऊन पाहिले, त्यावेळी त्यांना अश्विनीचा पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह दिसून आला. पोलिसांनी तात्काळ ही माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळतात डीसीपी सागर पाटील, एसीपी पुनम पाटील, ठाणेदार आसाराम चोरमले तसेच अन्य पोलीसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. मृतदेह टँकमधून बाहेर काढण्यात आला. दरम्यान अश्विनीची हत्या की तिने आत्महत्या केली, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
एक हजार लिटरची वॉटर टँक
अश्विनीचा मृतदेह असलेली वॉटर टॅंक ही १ हजार लिटर क्षमतेची आहे. त्याची उंची पाच फूट असून पोलिसांनी पाहिले असता त्याचे झाकण उघडलेले होते. त्यामुळे अश्विनीने त्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली किंवा कसे, याबाबत तूर्तास काहीही समोर आलेले नाही. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण समोर येईल.
प्रभारी आयुक्तांनी गाठले घटनास्थळ
अभियंता अश्विनी ही आई आणि भावासह रत्नदीप कॉलनी येथील घरात रहात होती. शनिवारी सकाळी अश्विनीचे मामा नळाच्या पाण्याने तोंड धुत असताना त्यांना पाण्यातून दुर्गंधी आली. त्यांनी घरावरची पाण्याची टाकी तपासली असता त्यामध्ये अश्विनीचा मृतदेह आढळून आला. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. प्रभारी पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, ठाणेदार आसाराम चोरमले यांच्यासह पोलिसांचा मोठा ताफा रत्नदीप कॉलनी परिसरात पोहोचला. श्वान पथक देखील घटनास्थळी पोहोचले.
तरुणीचा मृतदेह वॉटर टँकमध्ये आढळला. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांकडून प्राथमिक अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.
- आसाराम चोरमले, ठाणेदार गाडगे नगर