अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या हिवाळी २०२० परीक्षा येत्या २६ फेब्रुुवारीपासून घेण्याचे नियोजन चालविले आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून, समितीने तसा निर्णय घेतला आहे. १ ते ५ फेब्रुवारी दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासंदर्भात तयारी झाली आहे.
कोरोना संसर्गामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेशांना विलंब होत आहे. अशातच हिवाळी परीक्षादेखील लांबणीवर पडल्याने या महाविद्यालयांपुढे प्रवेश शुल्काबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विद्यापीठाने अभियांत्रिकी परीक्षांना प्राधान्य दिले आहे. त्यानुसार सत्र ५, ७ व ८ परीक्षांचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. एकंदर ३० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. परीक्षा अर्ज भरणे, परीक्षा शुल्क आणि मूल्यांकन आदी बाबी निश्चित झाल्या आहेत.
-------------
कोट
२६ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान अभियांत्रिकी परीक्षा घेण्यात येतील. वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परीक्षा ऑनलाईन घेण्याचे समितीने ठरविले आहे.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.
--------------
अभियांत्रिकीचे ४ ते ५ दिवसांत पेपर सेटिंग
विद्यापीठ अंतर्गत २३ महाविद्यालयांमध्ये सुमारे १४ शाखांच्या अभ्यासक्रमांचे चार ते पाच दिवसांत पेपर सेटिंग केले जाणार आहे. परीक्षा विभागाने अभियांत्रिकी प्राध्यापकांना तसे पत्र पाठविले आहे. पेपर सेटिंगबाबत आवश्यक ती काळजी घेण्यात येत असून, एक्स्पर्टकडून पेपर सेटिंग केले जाणार आहे.