प्रदीप भाकरे अमरावती : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने आपल्या खोलीवर गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना १२ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, गाडगेनगर पोलिसांनी त्याच्या मृतदेहाजवळून एक छोटीसी चिट जप्त केली आहे. त्यात त्याने ‘चिनूजवळ मोबाइल देजा, चिनू सर्वांना वाचून दाखवजो’, असे नमूद करीत एका नोट ॲपचाही उल्लेख केला आहे. त्यामुळे मोबाइलवरील त्या ॲपवरून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर येणार आहे. अनुराग मोहन तिखिले (२३, रा. चांदूरबाजार) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तर चिटमध्ये उल्लेखलेली चिनू ही त्याची बहिण आहे.
गाडगेनगर पोलिसांनुसार, अनुराग हा कठोरा मार्गावरील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. तो कठोरा मार्गावरील हरिओम कॉलनी येथे उताणे यांच्या घरी भाड्याने खोली करून राहत होता. बुधवारी दुपारी अनुरागने खोलीवर गळफास लावला. सोबत राहणारा मित्र खोलीवर आल्यावर तो धक्कादायक प्रकार उघड झाला. मित्राने अन्य काही सहकाऱ्यांच्या मदतीने अनुरागला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्यानंतर घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली. पोलिसांनी अनुरागचा मोबाइल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पोलीस करणार तपासपोलिसांनुसार, अनुरागच्या मोबाईलमध्ये नोट टेकिंग ॲप असेल. त्यात त्याने डिजिटल सुसाईड नोट लिहिलेली असू शकते. मृताने बहिणीच्या नावे लिहिलेल्या छोट्याशा चार ओळीच्या चिटमध्ये पासवर्ड देखील नमूद केला आहे. त्यामुळे पोलीस मृताच्या बहिणीकडून मोबाईलमधील त्या नोटमधील वास्तव जाणून घेणार आहेत. मात्र, तुर्तास तिखिले कुटुंबावर अनुरागच्या आत्महत्येने दु:खाचा डोंगर कोसळल्याने पोलीस प्रथम शवविच्छेदन व अन्य प्रक्रियेला प्राधान्य देणार आहे.