अमरावती: राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने सेंकड सेमिस्टरच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने मानसिक तणावातून वसतिगृहातच गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कायक घटना मंगळवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली.
मानसी प्रकाश खेरडे (१९) रा. बेलोरा, चांदूरबाजार असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. मानसी ही शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शिक्षणासाठी ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती. मानसीने बीईच्या सेकंड सेमिस्टरची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने मानसी मानसिक तणावात आली. त्यातून तिने मंगळवारी वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास लावून जीवनयात्रा संपविली.
बाहेर गेलेल्या इतर विद्यार्थिनी रात्री वसतिगृहात परत आल्यावर हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने घटनेची माहिती महाविद्यालय प्रशासन व राजापेठ पोलिसांना दिली. माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. पोलिसांनी घटनेच्या अनुषंगाने केलेल्या प्राथमिक चौकशीत मानसीने सेंकड सेमिस्टरच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे हे टोकाचे पाऊस उचलल्याचे समोर आले, अशी माहिती राजापेठचे प्रभारी ठाणेदार मनोज मानकर यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.