अमरावती : आपल्या पत्नीला येवदा येथील ठाणेदार तथा सहायक पोलीस निरीक्षक अमूल बच्छाव यांनी पळवून नेल्याचा खळबळजनक आरोप अकोला जिल्ह्यातील एका तरुण अभियंत्याने केला. याबाबत नोव्हेंबर २०२१ मध्येच तक्रार केली. त्यानंतर १० डिसेंबर रोजी बुलडाणा येथे अमूल बच्छाव यांच्या नावाचा संदर्भ देत एका अज्ञात व्यक्तीने आपल्याला धमकावले. या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण १८ फेब्रुवारी रोजी अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदविली असून, बच्छाव यांच्याकडून आपल्यासह आपल्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप त्या अभियंत्याने केला आहे.
दरम्यान, आलेल्या तक्रार अर्जाची दखल घेत याप्रकरणाची चौकशी दर्यापूरच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे, तर, बच्छाव यांना मंगळवारीच तातडीने नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. अमूल बच्छाव यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या अभियंत्याने बुुधवारी दर्यापूर येथे पत्रपरिषद घेतली.
आरोपानुसार, बच्छाव यांनी पदाचा गैरवापर करून बऱ्याच महिलांना प्रेमजाळ्यात ओढले. बच्छाव यांनी आपल्या पत्नीशी विवाहबाह्य संबंध प्रस्थापित केल्याने घटस्फोट घेतला. मात्र, कुटुंबीय व मुलाच्या काळजीपोटी आपण सारे काही पचवून तिच्याशी १९ नोव्हेंबर २०२१ रोजी पुनर्विवाह केला. अगदी दोन दिवसांनी २२ नोव्हेंबर रोजी ती बेपत्ता झाली. तिला बच्छाव यांनीच पळवून नेल्याचा दाट संशय आपल्याला असल्याचा आरोपदेखील अभियंत्याने केला. बच्छाव यांनी ते सर्व आरोप नाकारले आहेत. त्याबाबत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.