मोर्शी : शहरासह संपूर्ण तालुक्यात डेंग्यू या आजाराने थैमान घातले असून, मोर्शी शहरामध्ये अधिकतम डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. या ठिकाणी प्रशासकीय व सरकारी योजना फेल ठरल्यामुळे बहुतांश डेंग्यू रुग्णांनी खासगी दवाखान्यांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे शहरातील सर्व खासगी दवाखाने डेंग्यू आजाराच्या रुग्णांनी तुडूंब भरल्याचे दिसून येते.
हिवताप आजार अस्वच्छता, अशुद्ध पाणी प्यायल्याने होत असून, डेंग्यू हा आजार परिसरामध्ये घरामध्ये किंवा नगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये असलेल्या शुद्ध पाण्याच्या डब्यांमधून डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव होतो. परंतु याकरिता आरोग्य प्रशासनाकडून फक्त स्वच्छता ठेवावी, असे आवाहन करण्यात येते. मात्र, कृती करताना कुठलेही प्रशासन दिसून येत नाही. वृत्तपत्रांमध्ये बातमी छापून यावी, एवढ्यापुरतेच गप्पी मासे सोडणे किंवा स्वच्छता ठेवणे असे भसविले जाते. वस्तुस्थितीमध्ये हे सर्व होताना दिसत नाही.
मोर्शी शहरातील मध्य वस्तीसह कॉलनी परिसरातही डेंग्यूचे अधिकतम रुग्ण असून. एकाच कुटुंबातील दोन ते तीन रुग्ण डेंग्यूच्या विळख्यात सापडले आहेत. शहरामध्ये डेंग्यू या आजाराने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असूनसुद्धा प्रशासनाकडून कुठलीही यंत्रणा राबवली जात नसल्याचे दिसून येत आहे. उलट कॉलनी परिसरामधील कचराकुंड्या तुडूंब भरलेल्या दिसून येतात. या कचराकुंडीत असलेली घाण जनावरे परिसरातील असलेल्या घरांपर्यंत करतात. परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने पावसाळ्यामध्ये जी यंत्रणा राबविला पाहिजे ती यंत्रणा प्रशासनामार्फत राबविली जात नसल्याने येथील नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.