अमरावती : हरिसालच्या वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. दीपालीने आत्महत्यापूर्वी चार पानांचे सुसाईड नोट लिहून ठेवले आणि त्यानंतर एकूणच वनविभाग हादरून गेला. शुक्रवारी येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यालयाच्या प्रमुख प्रवेशद्धारावर कुलूप लागले होते. तर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या बंगल्यावर शुकशुकाट होता, हे विशेष.
मृत दीपाली चव्हाण यांनी चारपानी सुसाईड नोटमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी आणि गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्या नावांचा उल्लेख केला होता. त्यामुळे सकाळपासूनच एम.एस. रेड्डी हे कुठेच दिसून आले नाही. उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हा शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाहून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान भाजपने दोषींवर कारवाईची मागणी केल्यामुळे वातावरण तापले होते. बेलदार समाजही दीपालीच्या मारेकऱ्यांवर कारवाईसाठी एकवटला होता. दिवसभरात एकूणच घडामोडी या वनाधिकारी यांच्या विरोधात जात असल्याचे लक्षात येताच एपीसीसीएफ एम.एस. रेड्डी हे अचानक गायब झाले. ‘लाेकमत’चमुने याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, रेड्डी हे ‘ना कार्यालयात, ना बंगल्यात’ ते कुठेच दिसून आले नाही, हे वास्तव छायाचित्रणात कैद करण्यात आले आहे.
--------------------
पी. साईप्रसाद म्हणाले, ‘रेड्डी फरार हो गया’
वनरक्षक दीपाली चव्हाण याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) पी. साईप्रसाद आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर हे दोन्ही प्रमुख अधिकारी शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अमरावतीत दाखल झाले. त्यानंतर पी. साईप्रसाद यांना एपीसीसीएफ रेड्डी कुठेच दिसत नाही, असा प्रश्न ‘लोकमत’ने उपस्थित केला.
आमचा दौरा गोपनीय आहे, अशी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न पी. साईप्रसाद यांनी केला. मात्र, मेळघाटसह जिल्ह्यातून उपवनसंरक्षक तुमच्या भेटीला आलेत. रेड्डी का नाहीत, असा सवाल विचारताच पी. साईप्रसाद यांनी ‘रेड्डी फरार हो गया’ असे स्पष्ट सांगितले. यावेळी उपवनसंरक्षक पियूषा जगताप, चंद्रशेखरन बाला, गिन्नी सिंग, अविनाश कुमार यांनी पी. साईप्रसाद यांची भेट घेतली.