अमरावती : राज्यातील विविध जिल्ह्यांतून आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून जिल्ह्यात नव्याने सहा शिक्षक येणार आहेत, तर २९ शिक्षक जिल्ह्यांतून इतर जिल्ह्यांत जाणार आहेत.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री पूर्ण करण्यात आली. या बदली प्रक्रियेत शिक्षकांना सकाळी सुखद धक्का देत ईमेलवर बदली आदेश प्राप्त झाले आहेत. राज्यस्तरीय ऑनलाइन बदली पोर्टलवरून या बदल्यांवर शिक्कामोर्तब केले आहे. या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटी अथवा नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्रत्यक्ष या बदल्या होतील. पंधरा दिवसांपासून आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला सुरु होती. आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक प्राथमिक शिक्षकांनी अर्ज केले होते. यामध्ये आंतरजिल्हा बदलीवर सहा शिक्षकांना स्वजिल्ह्यात येण्याची संधी मिळाली आहे; तर इतर जिल्ह्यातील अमरावती जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २९ शिक्षकांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची संधी या बदली प्रक्रियेत मिळाली आहे.या जिल्ह्यात बदली प्रक्रियेच्या सहाव्या टप्प्यात ३५ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.