लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तब्बल दोन महिन्यांच्या धमाल सुटीनंतर बुधवारी शाळेची घंटा वाजली. सत्रारंभाला मोठ्या दिमाखात विद्यार्थ्यांनी शाळेत एन्ट्री मारली. कुठे ढोल-ताशांच्या गजर, कुठे प्रभातफेरी, तर कुठे गुलाबपुष्पांची उधळण; सोबतीला नवीकोरी पाठ्यपुस्तके आणि गणवेशही... उत्साहाच्या वातावरणात मुलांनी पहिल्या दिवशी धमाल केली.महापालिका शाळांमध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. मुलांवर पुष्पांचा वर्षाव झाला. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. काही शाळांना नवरीचा साज चढविला होता. शाळांच्या रंगरंगोटीसह रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी शोषखड्डे तयार करण्यात आल्याचे दिसून आले. महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्या संकल्पनेतून शाळांमध्ये प्रवेशात्सव साजरा करण्यात आला. महापालिका प्रभागनिहाय शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मुलांना गणवेश, पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. स्थानिक बुधवारा येथील महापालिका मराठी मुलींचे हायस्कूलमध्ये माजी महापौर विलास इंगोले यांच्या हस्ते मुलांना गणवेश वितरित करण्यात आले. यावेळी शिक्षण सभापती गोपाल धर्माळे, शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, मुख्याध्यापिका वैशाली कुºहेकर आदी उपस्थित होते. बडनेरा जुनी वस्ती येथील महापालिका शाळेत मुलांचे पहिल्याच दिवशी औक्षण झाले. पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापकांसह शिक्षक स्वागतासाठी हजर असल्याचे बघून मुलांचा आनंद द्विगुणित झाला. रडणारी मुले काही क्षणात हसायला लागली. कॅम्प स्थित १०० वर्षांच्या इतिहास लाभलेल्या महापालिका उच्च प्राथमिक शाळेत सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांनी छायाचित्रे घेतली. यावेळी शिक्षण सभापती पंचफुला चव्हाण, विजय चव्हाण, स्वाती चव्हाण, अध्यक्ष उज्वला भिसे, मुख्याध्यापक प्रीती खोडे, सुमेध वानखडे, योगेश पखाले, राहुल तायडे, योगेश चाटे आदी उपस्थित होते. शहरात अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला.हसू आणि रडूबुधवारी शाळेचा पहिला दिवस होता. पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांच्या आई-बाबांचे बोट सोडताना रडू कोसळले, तर तब्बल दोन महिन्यांनी आपले वर्गमित्र भेटणार असल्याने अनेक मुलांच्या चेहºयावर हसूही फुलले.आम्ही नाही जाणार शाळेत!बुधवारी शाळेचा पहिला दिवस. ज्या मुलांचे पहिल्यांदाच शाळेत प्रवेश झालेत, त्यांनी चक्क ‘आम्ही नाही जाणार शाळेत!’ अशी आई-वडिलांना नकारघंटा दर्शविली. तरीदेखील काही पालकांनी त्यांच्यासह गेटच्या आत प्रवेश केला. यात पालकांची दमछाक झाली. काही मुले वर्गात दाखल झाल्यानंतर रडायची थांबली.
विद्यार्थ्यांची शाळेत दिमाखात एंट्री; वाद्यसंगीत, पुष्पांनी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 11:35 PM