गणेश वासनिक
अमरावती :विदर्भातील व्याघ्र प्रकल्प काही कारणास्तव रखडलेली वन्यजीवांची प्रगणना केव्हा होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. गतवर्षी वन्यजीवांची प्रगणना होऊ न शकल्याने जंगल आणि व्याघ्र प्रकल्पात नेमके वन्यजीवांची संख्या किती ही आकडेवारी वनविभागाकडे अद्यापही उपलब्ध होऊ शकली नाही.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची प्रगणना करताना २० नोव्हेंबर २०२१ रोजी वनरक्षक स्वाती हुमने यांच्यावर वाघाने हल्ला करून फरफटत नेले आणि तिला ठार केले होते. या घटनेनंतर तोकड्या वन कर्मचाऱ्यांच्या भरोशावर जंगलात वन्यजीवांची प्रगणना धोकादायक असल्याचा आक्षेप घेत ती बंद पाडली. त्यानंतर विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची प्रगणना रखडली आहे. परंतु, आता वन्यजीव विभागाने रखडलेली वन्यजीवांची प्रगणना नव्याने आरंभण्याची तयारी केली आहे.
मात्र, सन २०२१ मध्ये मुंबई, मराठवाडा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी भागात व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची प्रगणना आटोपली असून, डेटा मात्र वरिष्ठांकडे पाठविला नाही, अशी माहिती आहे. तथपि, विदर्भात सर्वाधिक जंगल, व्याघ्र प्रकल्प असून, येथीलच वन्यजीवांची प्रगणना रखडल्याने वन्यजीवांचा डेटा गोळा करण्यात अडथळे निर्माण होत आहे. राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून, यात पाच एकट्या विदर्भात आहे. ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर अभयारण्याचा समावेश आहे. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे.
डेहराडून येथे पाठविला जाते माहिती
वन्यजीवांची प्रगणना प्रादेशिक वनविभागाच्या जंगलात चार वर्षातून एकदा करण्यात येते तसेच व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी केली जाते. परिणामी व्याघ्र प्रकल्पात रखडलेली वन्यजीवांची प्रगणना आता येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. प्रगणनेची माहिती गोळा करुन ती डेहराडून येथील वन्यजीव विभागांकडे पाठविली जाते. हा डेटा एकत्र केला जातो. त्यानंतर डेहराडून वन्यजीव विभाग यात काही सुधारणा करुन जंगल, वन्यप्राण्यांची आकडेवारी, सविस्तर मागदर्शक तत्त्वे जारी करते.
विदर्भात रखडलेली वन्यजीवांची प्रगणना लवकरच करण्यात येणार आहे. त्यानुसार तयारी सुरू झाली आहे. काही भागांत प्रगणना झाली असून, ज्या भागांत काही कारणास्तव थांबलेली प्रगणना आता नव्याने केली जाणार आहे. लवकरच प्रगणनेचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.
- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) नागपूर.