गणेश वासनिक अमरावती: राज्याच्या वन विभागाने १०७ सहाय्यक वनसंरक्षकातून ८५ जणांना विभागीय वनाधिकारीपदी पदोन्नतीची यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत बऱ्याच त्रुटी असून, काही वादग्रस्त आणि विभागीय चौकशी सुरू असलेल्या एसीएफ यांचीही नावे असल्यामुळे या यादीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
नागपूर येथील वन बल भवनातून प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमीता बिश्वास यांनी ३१ मार्च २०२३ रोजी सहाय्यक वनसंरक्षक गट -अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गामध्ये पदोन्नतीसाठी प्रस्ताव तयार केले आहे. यात भाषा परीक्षा, संगणक परीक्षा, मत्ता व दायित्व यासह विभागीय चौकशी वा फौजदारी प्रकरण असल्यास ते बढती पूर्वी वरिष्ठांकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच मागील १० वर्षाचा सेवा तपशील विवरण पत्रात एसीएफ यांना सादर करण्याचे कळविले होते. मात्र, वन विभागाने एसीएफ यांची पदोन्नती यादी जाहीर केली असता यात काही वादग्रस्त, विभागीय चौकशीतील एसीएफच्या नावांचाही समावेश आहे. त्यामुळे वन विभागाने जाहीर केलेली एसीएफ यांची यादी त्रुटीयुक्त असल्याचे वास्तव आहे. वसव यांचे सुसाईड नोट व्हायरल प्रकरण गुंडाळले?मेळघाट प्रादेशिक वनविभागातंर्गत घटांग येथील सहायक वनसंरक्षक व्ही.पी. वसव यांनी १० एप्रिल २०२२ रोजी स्वत:च सुसाईट नोट व्हायरल करून वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना गोवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी नागपूर येथील वरिष्ठांनी वसव यांना लेखी समज देऊन खुलासा मागविला होता. याबाबत मुख्य वनसंरक्षक़ जी.के. अनारसे यांच्या अध्यक्षतेत चाैकशी समितीदेखील गठीत करण्यात आली होती. मात्र, असे असताना आता व्ही. पी. वसव यांचे पदोन्नती यादीत ३८ व्या क्रमांकावर नाव आहे. त्यामुळे सुसाईड नोट व्हायरल प्रकरण गुंडाळले तर नाही? अशी चर्चा रंगू लागली आहे.सहाय्यक वनसंरक्षक व्ही.पी. वसव यांनी सुसाईड नोट व्हायरल केल्यासंदर्भातील चौकशी अहवाल वरिष्ठांना दिला आहे. याबाबत वरिष्ठांनी एसीएफ वसव यांना समज दिल्याची माहिती आहे. पुढे नेमकी त्यांच्यावर कोणती कारवाई झाली, हे वरिष्ठांनाच माहिती आहे. पदोन्नती यादीत नावांबाबत सीएफ कार्यालयाचा संबंध नाही.- जी.के. अनारसे, सीएफ, प्रादेशिक अमरावती.