अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात लागू संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता सकाळी ७ पासून दुपारी ३ पर्यंतच सुरू राहतील. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याबाबत आदेश रविवारी जारी केला. तो ३० एप्रिलच्या २३.५९ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहील.
हॉटेल, उपाहारगृहे, बार व खाद्यगृहांना सायंकाळी ६ पर्यंत घरपोच सेवा देता येईल. पूर्वीच्या आदेशातील इतर तरतुदी कायम आहेत. सर्व रुग्णालये, लसीकरण केंद्रे, उपचार केंद्रे, प्रयोगशाळा, पेट्रोलपंप, एटीएम केंद्रे, औषधी दुकाने, वैद्यकीय उपकरणे पुरविणारे उत्पादक, वितरक, वैद्यकीय विमा कार्यालये आदी सर्व सेवा त्यांच्या वेळेत सुरळीत सुरू राहणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षाप्राप्त असलेला अपराध केला, असे गृहीत धरण्यात येऊन त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येणार आहे.