अमरावती : कोरोना संर्सगाचे पार्श्वभूमीवर आरोग्ययंत्रणेला आलेल्या अडचणी, नव्याने उभाराव्या लागलेल्या बाबी आदींचा अभ्यास करून यापुढे सुसज्ज कायमस्वरूपी यंत्रणा उभी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दिले.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सीईओ अमोल येडगे, सीपी आरती सिंह, डीएसपी बालाजी, सीएस डॉ. श्यामसुंदर निकम, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, आयएमएचे डॉ. अनिल रोहणकर आदी उपस्थित होते.
साथीची तीव्रता, त्यापासून होणारी हानी रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. चाचणी, उपचार, मार्गदर्शन, लोकशिक्षण याबाबत कायमस्वरूपी यंत्रणा सर्वत्र उभी राहिली पाहिजे. यात ग्रामीण आरोग्य यंत्रणाही बळकट व्हावी. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्ययावत सुविधा उभाराव्यात. चाचणी प्रयोगशाळांचेही अद्ययावतीकरण व्हावे, असे मालकमंत्र्यांनी सांगितले
बॉक्स
उपचारानंतरही दक्षता महत्त्वाची
कोरोनाबाधितांवर उपचारानंतर ते बरे झाल्यावर घरी सोडण्यात येते. मात्र, उपचारानंतरही काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. त्यामुळे त्यांच्या दक्षता, समुपदेशनासाठी यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. याबाबत बरे झालेल्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी, फिजिओथेरपी, मेडिटेशन याबाबत स्वतंत्र सुविधा दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
बॉक्स
चाचण्यांची संख्यावाढ करा
कोरोना प्रतिबंधासाठी चाचण्यांची संख्या वाढ करा. सोबतच लसीकरणाचा विस्तारही होणे आवश्यक आहे. व्यक्तीला आपल्या चाचणीचे निष्कर्ष वेळेत कळावेत, यासाठी एसएमएस सुविधा सुरू केली आहे. मात्र, ती खंडित होता कामा नये. लसीकरणाबाबत नोंदणी केलेल्या व्यक्तींना जाणाऱ्या संदेशातही अचूकता व स्पष्टता नसल्याबाबत तक्रारी आल्या आहेत. असे होता कामा नये, अशी तंबी पालकमंत्र्यांनी दिली.