लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामविकास, कृषी व महसूल विभागांच्या समन्वयाने शेती क्षेत्राचा विकास साधण्याचे उद्दिष्ट ठेवून ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कृषी विकास समिती गठन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या तिन्ही यंत्रणेच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे या समित्या गावोगाव तातडीने स्थापन करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी दिले.खरीप हंगाम नियोजन व आढाव्यासाठी ऑनलाईन बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार नवनीत राणा, आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, आमदार. किरण सरनाईक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, कृषी सहसंचालक तोटावार, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे आदी यावेळी उपस्थित होते. खरिपासाठी गुणवत्तापूर्ण बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. यंदा महाबीजच्या माध्यमातून अधिकाधिक पुरवठा व्हावा आणि या प्रमाणित बियाण्यांची पेरणी जे शेतकरी करतील, त्यांना कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेने पुढील वर्षी आवश्यक ती काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बियाणे, खते, कीटकनाशके यांची उपलब्धता, पुरवठ्याबाबत संनियंत्रण करावे, जेणेकरून गैरप्रकार व शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. भरारी पथकाने याबाबत दक्ष राहून काम करावे अन्यथा, ज्या तालुक्यासाठी तक्रारी प्राप्त झाल्या, तेथे नियुक्त भरारी पथकावरही कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्र्यांनी यावेळी यंत्रणेला दिला. पीक कर्जवाटपाबाबत सहकारी बँकांचे अधिकारी व बँकांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक ऑनलाईन आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
तालुकास्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखाली बैठकपीक कापणी प्रयोगाच्या वेळेस लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घ्यावे. त्याचप्रमाणे, सर्व लोकप्रतिनिधींचा सहभाग मिळवून व्हाॅटसॲप ग्रुप तयार करावा. प्रत्येक तालुका स्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य यांची खरीप नियोजनाबाबत, तसेच विस्तार कार्यक्रमाबाबत अष्टसूत्री, उत्पादकता वाढ व उत्पादन खर्च कमी करणे आदींबाबत ऑनलाईन सभा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
क्षेत्रीय कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत पोहचावा‘मनरेगा’मध्ये जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर फळबाग व वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर नियोजन करण्यात आले आहे. ते प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेने व संलग्न इतर यंत्रणांनीही नियोजनबद्ध प्रयत्न करावे. खरीप हंगामातील कामे, पीक उत्पादकता वाढ, खर्च कमी करणे याबाबत कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून जनजागृती करावी, असे पालकमंत्री म्हणाल्या.