अमरावती : कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषिक्रांतीकरिता शेतकऱ्यांसाठी जे स्वप्न पाहिले, त्या स्वप्नाच्या परिपूर्तीच्या दृष्टीने श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाद्वारा संलग्नित श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत महाविद्यालयात शेतकऱ्यांना भाडेतत्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवासुविधा पुरविण्यासाठी कृषी औजारे बँकेची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात अश्या प्रकारची ही पहिलीच बँक स्थापन होत आहे.अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भाग कोरडवाहू सदरात येत असल्याने शेतकऱ्यांना कृषी औजारे व उपकरणे स्वत: खरेदी करता येत नाही याचा विचार करता कृषी औजारांच्या सेवा सुविधा शेतकऱ्यांना प्रचलित दरापेक्षा कमी दराने उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने ही बँक स्थापित करण्यात आली आहे. या बँकेत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पावर टिलर, लॅन्ड लेव्हलर, कल्टीव्हेटर, व्ही पास, २ व ३ फरो सरी रिजन, सीड कम फर्टीलाइझर ड्रील, मल्टीक्रॉप थ्रेशर, बेड मेकर, पॉवर विडर, नांगर अशी विविध औजारे व उपकरणे उपलब्ध राहणार आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्था व कृषि विभाग, अमरावती यांच्या संयुक्त आर्थिक साहाय्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या बँकेच्या स्थापनेकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य उमाकांत वडनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख व बँकेचे प्रभारी शशांक देशमुख यांनी परिश्रम घेतले. या बँकेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याकरिता श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रथमच कृषी औजार बँकेची स्थापना
By admin | Published: March 29, 2015 12:23 AM