(फोटो आहे. )
अमरावती : शहरातील विविध मार्गावर पडलेले खड्डे बुजवा, शहरातील रस्त्यांची, नाल्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा या मागणीकरिता युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत आगळेवेगळे आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात गणपतीच्या मूर्तीची विधिवत पूजा व स्थापना करून गणरायाची आरती करण्यात आली. अधिकाऱ्यांना कामे करण्यासाठी सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना त्यांनी केली.
आंदोलन गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास करण्यात आले. यावेळी ढोल, तासे वाजत-गाजत युवासेनेचे पदाधिकारी बांधकाम विभागात शिरले. गणपती बाप्पा मोेऱ्या, ‘जय भवानी जय शिवाजी असे नारे यावेळी लावण्यात आले. कार्यकारी अभियंता उपस्थित नसल्याने उपअभियंता विनोद बोरसे यांच्याशी युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख राहुल माटोडे यांनी चर्चा करून तातडीने कामे करा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा इशारा दिला. त्यानंतर निवेदन देण्यात आले.
१० सप्टेंबरला गणेश उत्सव सुजत होत आहे. त्यापूर्वी शहरातील मुख्य चौकातील अर्धवट असलेले काँक्रीटीकरणाचे रस्ते, नाल्या, पूर्ण करा तसेच नव्याने सुरू असलेला जुना बायपास, एमआयडीसी मार्गाचे डांबरीकरणाचे कामाची चौकशी करून निकृष्ट दर्जाचे पेव्हर तात्काळ काढण्यात यावे, अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावेळी राहुल माटोडे, संजय शेटे, सिचन ठाकरे, चेतन वानखडे, अनिकेत ढाणके, गोलू नायले, पंकज फुके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.