परशराम महाराजांच्या सन्मानार्थ परंपरा:
अनंत बोबडे
येवदा : महाराष्ट्रात रंगपंचमी हा सण अतिजल्लोषाचा म्हणून साजरा केला जातो. पाच दिवस चालणाऱ्या या सणादरम्यान रंग, पिचकारी व पाण्याचा बेसुमार वापर होतो. परंतु, दर्यापूर तालुक्यामधील पिंपळोदवासी ६० वर्षांपासून प.पू. परशराम महाराजांच्या सन्मानार्थ होळी व रंगपंचमी खेळत नाहीत.
पिंपळोदवासीयांनी ती परंपरा आजही कायम ठेवली आहे. संत परशराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या पिंपळोद येथे आयटीआयचे मुख्याध्यापक राजेद्र वाघझाडे व संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव देशमुख सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने आयटीआयच्या प्रांगणात या दोन दिवसांत गावामध्ये महाराजांच्या सन्मानार्थ पालखीची परिक्रमा व शोभायात्रा काढली जाते. कीर्तन व महाप्रसादाचे कार्यक्रम केले जातात. परंतु, यावर्षी कोरोना विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, या उद्देशाने महाराजांचे जागेवरच पूजन करून प्रसादाचे आयोजन करण्यात आले.
पिंपळोदवासीयांना अनेक पद्धतीने महाराजांनी साक्षात्कार दिला. पिंपळोद येथील श्यामराव देशमुख यांची मुलगी मनोरमा ही अचानकपणे मरण पावली. मरण पावलेल्या मुलीवर महाराजांनी हात ठेवताच ती जिवंत झाली. तेव्हा महाराजांचा चमत्कार त्या गावातील लोकांनी स्वत: अनुभवला. अवलिया असलेले परशराम महाराज होळीच्या दिवशी इंजा या गावात अनंतात विलीन झाले. तेव्हा पिंपळोद गावकऱ्यांनी महाराजांचे पार्थिव गावात आणून त्यांना समाधी दिली. त्यांच्या सन्मानार्थ गेल्या ६० वर्षांपासून या गावात होळी व रंगपंचमी आजही खेळली जात नाही.
------------