अमरावती : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला. परंतु, श्रीनिवास रेड्डी, विनोद शिवकुमार या भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांचा कोर्टात बचाव होण्यासाठी वनविभाग खातेचौकशी करीत नसल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
दीपाली यांनी २५ मार्च रोजी स्वत:च्या पिस्टलने गोळ्या झाडून आत्महत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण वनविभाग हादरून गेला. एका महिला अधिकाऱ्यांना गोळी झाडून आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरूद्ध चार पानांचे सुसाईड नोट लिहून ठेवले. यावरून राजकीय, सामाजिक, महिला संघटना, स्वयंसेवी संस्था, महाराष्ट्र बेलदार समाजाने उठाव केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्याअनुषंगाने २६ मार्च रोजी नागपूर रेल्वे स्थानकाहून गुगामलचे निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली. त्यानंतर सुसाईड नोटच्या आधारे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची २६ मार्च रोजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) पी. साईप्रसाद यांनी नागपूर येथील कार्यालयात बदली करून हजर राहण्याचे आदेश जारी केले. दरम्यान ३० मार्च रोजी शासनाने रेड्डी यांचे निलंबनाचे आदेश जारी केले. मात्र, रेड्डी, शिवुकमार या दोन्ही आयएफएस अधिकाऱ्यांचे इतक्या संवेदनशील प्रकरणी निलंबन झाले असताना त्यांची खातेचौकशी का नाही? याबाबत शंका उपस्थित होत आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या पुढाकाराने दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील यांनी श्रीनिवास रेड्डी यांना नोटीस बजावून हजर होण्यासाठी डेडलाईन दिली आहे.
--------------
रेड्डी यांच्याकडून पुरावे नष्ट करण्याच्या हालचाली
आरोपी विनोद शिवकुमार याची कोर्टाने दोनवेळा जामीन नामंजूर केला. मात्र, दीपाली आत्महत्याप्रकरणी तपास अधिकारी कविता पाटील यांनी दीपाली यांची वैयक्तिक डायरी जप्त केलेली नाही. हरिसाल येथील आरएफओ कार्यालयातून कागदपत्रे ताब्यात घेतले. मात्र, दीपाली यांच्या निवासस्थानाची तपासणी केली नाही. दुसरीकडे श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल नसल्याने ते पुरावे नष्ट करीत असल्याची दाट शंका उपस्थित होत आहे. दीपाली यांच्या सुसाईड नोटनुसार रेड्डी यांच्या कार्यालयाची पोलिसांनी तपासणी केली नाही. दोन वर्षांत दीपाली यांच्या तक्रारींची शहानिशा केली नाही. त्यामुळे पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह आहे.
--------------------
श्रीनिवास रेड्डी, विनोद शिवकुमार यांच्याविरूद्ध वनविभागाने प्राथमिक चौकशी समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल अद्यापही अप्राप्त आहे. त्यामुळे या दोघांचे निलंबन झाले असले तरी त्यांची तूर्त खातेचौकशी करता येणार नाही.
- नितीन काकाेडकर, प्रधान मुख्यवनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र