सध्या मोबाइलचा जमाना असला तरी जिल्ह्यात अजूनही क्वाॅइन बॉक्स आणि लॅण्डलाइन फोन वापरले जात आहेत. जिल्ह्यात भारत संचार निगम लि.चे लॅण्डलाइन कनेक्शनधारक ११ हजार ग्राहक आहेत, तर अद्यापही ४१ क्वाॅइन बॉक्सवर ट्रिंग ट्रिंग वाजतेय.
पूर्वी घरी लॅण्डलाइन फोन असणे म्हणजे श्रीमंतीचे व प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जात होते. जेव्हा मोबाइल नव्हते तेव्हा घराघरात लॅण्डलाइन फोनचा वापर केला जात होता. कालांतराने व्यावसायिक क्वॉइन बॉक्स आले. एक रुपया टाकला तर फोन लागायचा त्यात क्वाॅइन बॉक्स व्यावसायिकाला ४० टक्के कमिशन मिळत होते, अशी माहिती बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र आता प्रत्येकाकडे मोबाइल फोन आल्याने क्वाॅइन बॉक्स कुणी घेत नाही मात्र शहरात ३४, तर ग्रामीणमध्ये सात असे एकूण ४१ क्वॉइन बॉक्सधारक आहेत. जिल्ह्यात ११,३४४ लॅण्डलाइन फोन नागरिकांच्या घरी आहेत. एक वेळी मोबाइलची रेंज मिळणार नाही मात्र लॅण्डलाइन फोन विश्वासाने लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. प्रत्येक सरकारी कार्यालयात लॅण्डलाइन फोनचा वापर होतो.
बॉक्स :
केवळ ११ हजार लॅण्डलाइनधारक
पूर्वी ५० हजारापेक्षा जास्त लॅण्डलाइनधारक बीएसएनएलचे ग्राहक होते. मात्र कालांतराने प्रत्येक नागरिकांच्या हाती स्मार्ट फोन आल्याने आता फक्त ११ हजार ३४४ लॅण्डलाइन फोनधारक जिल्ह्यात आहेत. त्यातही सर्वाधिक ग्राहक हे शहरात असून, त्याची संख्या ८,३४६ असून, ग्रामीण भागात तर २,९९८ ग्राहक आहेत.
बॉक्स:
जिल्ह्यात ४१ क्वाॅइन बॉक्स
बीएसएनएलकडून कनेक्शन घेतलेले जिल्ह्यात फक्त ४१ क्वाॅइन बॉक्स आहेत. काही हौशी व्यावसायिक अद्यापही क्वॉईन बॉक्स आपल्या दुकानात ठेवून व्यवसाय करीत आहेत. मात्र आता मोबाइलचा जमाना असल्याने क्वॉइन बॉक्सचा वापर फारसा केला जात नाही. शहरात ३४, तर ग्रामीणमध्ये सात क्वाॅइन बॉक्स उरले आहेत.
बॉक्स:
व्यवसायाकरिता बॉक्स
व्यवसाय करण्यासाठी बॉक्स लावला होता. पूर्वी एका दिवसात चारशे ते पाचशे कॉल व्हायचे तेव्हा क्वाॅइन बॉक्सचा व्यवसाय पुरत होता; मात्र आता कुणी फारसे कॉल लावत नाही. मात्र छंद असल्याने हा बॉक्स ठेवला असल्याचे एका व्यावसायिकाने सांगितले.
म्हणून लॅण्डलाइन आवश्यकच
गेल्या अनेक वर्षांपासून घरी लॅण्डलाइन फोन आहे. त्याची आम्हाला आता सवई झाली आहे. मोबाइलची घरात कधी कधी रेंज मिळत नाही. मात्र लॅण्डलाइनवर फोन न चुकता येतो. म्हणून लॅण्डलाइन फोन आवश्यक आहे.
अनंत टाले, नागरिक अमरावती