लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाने अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीची घोषणा केली. त्यानुसार जागेची चाचपणी करून समितीने बडनेरा नजीकच्या कोर्डेश्वर मार्गालगत वडद (अलियाबाद) या परिसरात 'मेडिकल कॉलेज' निर्मितीवर शिक्कामोर्तब केले. मात्र ही जागा अतिशय लांब असून जिल्ह्यातील गोरगरीब, सामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा लाभ ■ मिळणे कठीण होईल, अशी भूमिका आमदार सुलभा खोडके यांनी घेतली आहे. जागेसंदर्भात पुन्हा एकदा बैठक बोलावून निर्णय घ्यावा अशी सुचना करत पर्यायी जागा देखील आ. खोडके यांनी सुचविली आहे.
आ. रवी राणा यांनी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शासकीय मेडिकल कॉलेज सुरु करा व बांधकामासाठी निधी मंजूरीबाबतचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. तर आ. यशोमती ठाकूर यांनी महाविद्यालयासाठी पूर्वी नांदगाव पेठ येथील जागा मंजूर झाली होती. परंतु काहींनी ती जागा वेळेवर बदलवली. त्यामुळे नांदगाव पेठ या - पूर्वीच्याच जागेवर मेडिकल कॉलेज स्थापन व्हावे. अशी भूमिका घेतली.
पुन्हा बैठक घेऊन जागेसंदर्भात निर्णय घ्या: सुलभा खोडकेशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री समितीने ठरविलेली जागा अमरावती शहरापासून १० किलोमीटर दूर असल्याने रुग्णांना तिथे जाणे दुरापास्त होणार आहे. मेळघाट-धारणी व गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणे हेच महाविद्यालय स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जागेसंदर्भात समितीने घेतलेला निर्णय बदलविण्यात यावा, अशी स्पष्ट भूमिका मांडून पुन्हा एकदा बैठक घेऊन जागेसंदर्भात निर्णय घ्यावा, असा तारांकित प्रश्न आ. खोडके यांनी गुरुवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला.
नांदगाव पेठ येथेच व्हावे - अॅड. यशोमती ठाकूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पूर्वी नांदगाव पेठ येथील जागा मंजूर झाली होती. परंतु काही भू-माफियांच्या जमिनीचे भाव वाढविण्यासाठी राजकीय स्वार्थापोटी ती जागा वेळेवर बदलविण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात उपमुख्यमंत्री समितीने जो निर्णय घेतला, ती जागा अमरावती शहरापासून १० किलोमीटर दूर असल्याने रुग्णांना तिथे जाणे अवघड होणार आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ जाईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उपयुक्तता जिल्ह्याकरिता होणार नाही. त्यामुळे जागेसंदर्भात समितीने घेतलेला निर्णय बदलविण्यात यावा, अशी आमची आग्रही मागणी आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांची शासनाकडे केली आहे.
यावर्षीपासूनच मेडिकल कॉलेज सुरु व्हावे : रवी राणाशैक्षणिक वर्ष २०२४ पासून अमरावती शासकीय मेडिकल कॉलेज सुरु करा. अधिकारी, कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याची मागणी आ. रवी राणा यांनी विधानसभा अध्यक्षांना बुधवारी पत्राद्वारे केली आहे. मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामाला १३०० कोटींपैकी पुरेसा निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शासकीय मेडिकल कॉलेजबाबत सभागृहात लक्षवेधी सादर करण्यात आली आहे. कोंडेश्वर मार्गालगत हे मेडिकल कॉलेज निर्माण होत असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले.
राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री काय म्हणाले?"शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी समितीने निवडलेल्या जागेसंदर्भात बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. ती जागा समितीने नेमलेली असल्याने आता जाईल, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ."- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री