अमरावती : भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो, असे वादग्रस्त वक्तव्य माध्यमांशी बोलताना राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी येथे केले. या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर राज्यात चांगलेच पडसाद उमटले आहे.
ना. कोकाटे जिल्हा कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन व शेतकऱ्यांशी परिसंवाद साधण्यासाठी अमरावतीला आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पीक विम्यासंदर्भात असे वक्तव्य केले. ते म्हणाले एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही. आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो. त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आहे. अन्य राज्यातील लोकांनी यामध्ये अर्ज केले.
याबाबत चौकशी केली असताना लक्षात आल्याने चार लाख अर्ज रद्द करण्यात आले. कुठे तरी सीएससी केंद्रवाले असे काही उद्योग करीत असावे, असा माझा संशय आहे. काही जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे ना. कोकाटे म्हणाले. वक्तव्यादरम्यान कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केल्याचा आरोप आता विरोधकांद्वारे केल्या जात आहे. त्यामुळे ना. कोकाटे यांचे हे वादग्रस्त वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे.जबाबदारीने बोलावे, भाजपचा सल्लाशेतकरी अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उल्लेख आदरानेच व्हायला पाहिजे, असा सल्ला भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर यांनी कृषिमंत्र्यांना दिला आहे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते या वक्तव्यावर चांगलेच संतापले, ते म्हणाले शेतकऱ्याला आपण अन्नदाता संबोधतो. त्यांना भिकाऱ्याची उपमा देणे योग्य नाही, सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे उपकार करते करते का, असा सवाल त्यांनी केला तर लोकभावना दुखावणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी कृषिमंत्र्यांना दिला.
शेतकरी हा देशाचा मालक, त्याला भिकारी म्हणायची कृषिमंत्र्यांची हिंमत कशी होते?- काँग्रेस
एक रुपयांमुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले. बाहेरच्या कंपन्यांनी त्यामध्ये ऑनलाइन अर्ज भरले. एक रुपयात विमा स्वस्त असल्याने त्या कंपन्यांनी गैरफायदा घेतला. हा गैरफायदा घेऊ नये म्हणून विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुनर्विचार करत आहे. त्यामध्ये अभ्यास करून धोरण ठरवू, माझ्या वक्तव्याचा विर्पयास केला गेला.- माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री