- गणेश वासनिक
अमरावती : व्याघ्र प्रकल्पलगतच्या गावांतील श्वानांपासून वाघांना धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर आता गावठी श्वानांवरही नजर ठेवण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने 'गाईडलाईन' पाठविल्या असून, राज्यात व्याघ्र प्रकल्पांमध्ये त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
हल्ली देश, विदेशात कोरोना विषाणूचा फैलाव जोरात होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने वन्यजीवांचे संरक्षण, काळजी घेण्याबाबत 'गाईडलाईन' जारी केली आहे. विशेषत: व्याघ्र प्रकल्पानजीकच्या गावांतून श्वान हद्दीत येणार नाही, याची कटाक्षाने काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोना विषाणूच्या धर्तीवर श्वानांना विविध रोग जडत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यादरम्यान वाघाने श्वानांची शिकार केल्यास त्या मांसापासून वाघांना गंभीर स्वरुपाचे रोग होऊ शकतात, असे पशूवैद्यकांचे मत आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पातील वाघ, बिबट्यांसह अन्य वन्यजीवांचे श्वानांपासून संरक्षण करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहे. राज्यात ताडोबा- अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव- नागझिरा, बोर अभयारण्य व सह्यांद्रीत वन्यजीवांचे संरक्षण करण्यात येत आहे.
पाच देशांतील पर्यटनांवर विशेष लक्ष
राज्यात व्याघ्र प्रकल्पांना विदेशी पर्यटक भेटी देतात. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चीन, जपान, इटली, इराण व दक्षिण कोरीया येथील पर्यटकांवर विशेष लक्ष देण्याचे राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने कळविले आहे. व्याघ्र प्रकल्पात प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना राज्य, जिल्हा आरोग्य अधिकाºयांची मदत घ्यावी लागेल. व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांचे स्क्रिनिंग करण्याचे निर्देश आहे. व्याघ्र प्रकल्पांमध्ये येणारे प्रवासी, वन्यजीव, अतिथी कक्ष, इंटरपिटीशन केंद्रावरही वनाधिकाऱ्यांना सज्ज राहावे लागणार आहे. मोक्याच्या ठिकाणी आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्यावतीन कोरोना जनजागृतीचे पोस्टर लावण्याचे निर्देश आहेत.
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत कुत्र्यांना मनाई आहे. किंबहुना लगतच्या गावातील श्वान हद्दीत आल्यास ते पकडले जातात. अन्यथा वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्यांना प्रसंगी जीवेदेखील मारल्या जाते. - एम.एस. रेड्डी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प