अमरावती - मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेले मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ मिळण्याबाबत लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी पैठण येथील सभेत बोलतांना स्पष्ट केले. तसेच, पैठण मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी मोठा निधीही मुख्यमंत्र्यांनी देऊ केला आहे. त्यामुळेच, मंत्री संदीपान भुमरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. आता, आमदार बच्चू कडू यांनीही आपल्या मतदारसंघात २०० कोटींच्या कामाचा शुभारंभ केला आहे.
शिवसेनेत असलेल्या आणि शिवसेनेसोबत असलेल्या अशा एकूण ५० आमदारांनी एकनाथ शिंदेंसह वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाले, तर भाजप-शिवसेना युतीचं सरकार राज्यात स्थापन झालं. त्यामुळे, सध्या शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात विकासकामाचा जोर दिसून येत आहे. संदीपान भुमरे यांच्या पैठणला मिळालेल्या निधीबद्दल, पाण्याच्या योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. आता, आमदार बच्चू कडू यांच्या मतदारसंघातही खच्चून निधी देण्यात आला आहे.
आमदार कडू यांनी १२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर असा विकामकामांच्या शुभारंभाचा पंधरवाडाच आखला आहे. २०० कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ पंधरवडा असे म्हणत पुढील १५ दिवसांत मतदारसंघातील कोणत्या भागात, कोणती कामं होणार आहेत, यासंदर्भातील माहिती कडू यांनी ट्विटरवरुन शेअर केली आहे. विशेष म्हणजे २०० कोटींच्या निधीतील कामांचा हा पहिला टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आपल्या मतदारसंघात निधी मिळत नाही. राष्ट्रवादीच्या आमदाराला, त्यांच्या मतदारसंघाला सर्वाधिक निधी देण्यात येतो, असा आरोप करुनच शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर, राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर, आपल्या आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी वाटप त्यांच्याकडून करण्यात येत आहे.